औरंगाबाद : शाहगंज येथील दुकानावर छापा मारून सिटीचौक पोलिसांनी ५५ हजार ६१८ रुपयांची सुगंधी तंबाखू आणि पानमसाला जप्त केला. याप्रकरणी अन्न व औषधी प्रशासन विभागाने सिटीचौक ठाण्यात गोदामचालकासह इतरांविरोधात गुन्हा नोंदविला. श्रेणिक सुरेशचंद्र सुराणा आणि अन्य आरोपींचा यात समावेश आहे.
शाहगंज येथील बॉम्बे सुपारी स्टोअरमध्ये बंदी असलेली सुुगंधी तंबाखू आणि पानमसाला विक्रीसाठी आणून ठेवल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक दादासाहेब सिनगारे, अन्नसुरक्षा अधिकारी प्रशांत सुरेश अजिंठेकर यांनी ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता या दुकानावर छापा टाकला. दुकानाच्या झडतीत सुमारे ५५ हजार ६१८ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू, पानमसाल्याचा साठा आढळला. याप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी अजिंठेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दुकानमालक श्रेणिक सुरेशचंद्र सुराणा आणि इतर पुरवठादारांविरोधात गुन्हा नोंदविला. पोलिसांनी हा माल जप्त केल्याचे निरीक्षक सिनगारे यांनी सांगितले.