लातूर : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातील चार उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे या उमेदवारांचे समर्थक म्हणून शेकडो शिक्षक औरंगाबादला गेले असून, जिल्ह्यातील जवळपास ५५० शिक्षकांनी रजा घेऊन उमेदवारांच्या शक्तीप्रदर्शनात सहभागी होण्यासाठी शाळेला दांडी मारली आहे.लातूर जिल्ह्यात माध्यमिकच्या ६३१ शाळा आहेत. तर ७ हजार ५४३ शिक्षकांची संख्या आहे. बहुतांश शिक्षक कोणत्या ना कोणत्या शिक्षक संघटनेत आहेत. या संघटनांचा काही उमेदवारांना पाठिंबा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५५० शिक्षक रजेवर आहेत. शाळा बुडवून शिक्षकांनी प्रचारात सहभागी होऊ नये, असे निर्देश दिले असतानाही ५५० शिक्षकांनी रजा घेतली आहे. रजेचा अधिकार अबाधित ठेवून निवडणूक आयोगाचे हे निर्देश आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या शक्तीप्रदर्शनात सहभागी होण्यासाठी हे शिक्षक औरंगाबाद सहलीवर आहेत. लातूर जिल्ह्यातील या निवडणुकीसाठी चार उमेदवार आहेत. त्यात विद्यमान आमदार विक्रम काळे, शिक्षक काँग्रेसचे राज्याध्यक्ष कालिदास माने, भारिप-बहुजन महासंघाचे प्रा. भालचंद्र येडवे, कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. संग्राम मोरे यांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वाधिक शिक्षक लातूर जिल्ह्यातून औरंगाबादला गेले असल्याचे बोलले जात आहे. जी शाळा सहा शिक्षकांची आहे, त्या शाळेत दोनपेक्षा अधिक शिक्षकांना रजा देऊ नये, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. या आदेशाचे पालन करून शिक्षक संघटनांचे पदाधिकारी रजा घेऊन उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी औरंगाबादेत गेले असल्याचे सांगण्यात येते. (प्रतिनिधी)
५५० शिक्षक रजेवर !
By admin | Published: January 17, 2017 10:47 PM