छत्रपती संभाजीनगर : निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात लग्नसराई असली तर उमेदवारांसाठी पर्वणीच ठरते. कारण, लग्नात हजारो मतदारांची एकाच ठिकाणी भेट होते व अप्रत्यक्षपणे प्रचारही होतो. मात्र, ऐन मतदानाच्या दिवशी जर लग्नतिथी असेल तर त्यादिवशी मतदानाची टक्केवारी घसरते. परंतु, ३ मेपासून लग्नसराईच्या धामधुमीला पुढील ५७ दिवसांसाठी ब्रेक लागणार आहे.
यामुळे १३ मे रोजी मतदानाच्या दिवशी कोणताही लग्नमुहूर्त नसल्याने उमेदवारांनाच नव्हे, तर निवडणूक यंत्रणेलाही दिलासा मिळाला आहे. राज्यात ७ व १३ मे रोजी २२ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.
मे महिन्यात दोनच लग्नतिथी
मे महिनाभरात दोनच लग्नतिथी पंचांगात देण्यात आल्या आहेत.
यात १ व २ मे या दोन तिथी आहेत.
३ मेपासून लग्नमुहूर्त नाहीत. थेट २९ जूनलाच पुढील मुहूर्त आहे.
प्रचार यंत्रणेवरील ताण कमी
राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, यंदा १३ मे रोजी सोमवारी लग्नतिथी नाही. यामुळे प्रचार यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे.
नाही तर लग्नसराईतून लोकांना आवाहन करून मतदान केंद्रात आणावे लागले असते. मात्र, उष्णतेची लाट असल्याने मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढणे, हे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.
लग्न, मुंजीत प्रचार
लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसांत उमेदवारांनी अनेक मंगल कार्यालयांत जाऊन लग्न सोहळ्यांना भेट दिली. उपनयन संस्कार सोहळ्यांतही हजेरी लावून अप्रत्यक्ष प्रचार करीत संधीचे सोने केले.