गेवराई : सनईचे मंजूळ सूर...फटाक्यांची नेत्रदीपक अतषबाजी...आकर्षक विद्युत रोषणाई...हजारो वऱ्हाडींची उपस्थिती...अशा उत्साही वातावरणात रविवारी सायंकाळी ५७ जोडपी विवाहबद्ध झाली. गढी (ता. गेवराई) येथे शारदा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.शारदा प्रतिष्ठानच्या वतीने १८ वर्षांपासून हा उपक्रम राबविला जातो. यंदाचे १९ वे वर्षे आहे. या सोहळ्याची दोन महिन्यांपासून तयारी सुरू होती. रविवारी सकाळपासूनच वधू-वर पक्षांकडील वऱ्हाडींची रेलचेल होती. सायंकाळी मंदिरापासून विवाहस्थळापर्यंत नववधू-वरांची सवाद्य परण्या निघाला. प्रतिष्ठानच्या वतीने नवरदेवास कपडे, नववधूसाठी मणीमंगळसूत्र, नवदाम्पत्यासाठी संसारोपयोगी साहित्य, पादत्राणे देण्यात आली. सायंकाळी ६.३५ च्या मुहूर्तावर ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंगलाष्टके सुरू झाली. हजारोंवर स्वयंसेवकांनी बडदास्त राखली.यावेळी माजी मंत्री शिवाजीराव पंडित, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रतिष्ठानचे कार्यवाह आ. अमरसिंह पंडित, जि. प. सदस्य विजयसिंह पंडित, जयसिंह पंडित, ह.भ.प. तीर्थराज पठाडे, दत्ता महाराज गिरी, लक्ष्मण महाराज लाड, संभाजीराव पंडित, प्रदीप सोळंके, प्रा. पी. टी. चव्हाण, भाऊसाहेब नाटकर, सुरेश हात्ते, बप्पासाहेब मोटे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
५७ जोडप्यांचे सामुदायिक शुभमंगल
By admin | Published: April 30, 2017 11:39 PM