लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आदिवासींसाठी असलेल्या योजनेची अंमलबजावणी न करता बनावट कागदपत्रांच्या आधारे ५९ लाख ३० हजार १७२ रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी तत्कालीन प्रकल्प अधिकारी दिलीप देशमुख आणि त्यांच्या सहकाºयांविरोधात सिडको पोलिसांनी १७ जुलै रोजी गुन्हा नोंदविला. विशेष म्हणजे याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर निवृत्त न्यायमूर्र्तींमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली.अधिक माहिती देताना सिडको पोलिसांनी सांगितले की, सिडको एन-८ येथे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालय आहे. या कार्यालयांमार्फत आदिवासींसाठी असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम केले जाते. २००५ ते २००९ या कालावधीत दिलीप देशमुख हे एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयात प्रकल्प अधिकारीपदी कार्यरत होते. या काळात त्यांनी शासकीय योजनेची अंमलबजावणी करताना पदाचा दुरुपयोग केल्याच्या तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या होत्या.त्यानंतर शासनाने या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीश एम.जी. गायकवाड यांची चौकशी समिती नियुक्त केली. समितीने या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल शासनास सादर केला. या अहवालानुसार आरोपी दिलीप देशमुख यांच्याविरोधात असलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. देशमुख यांनी कार्यालयीन अन्य अधिकारी, कर्मचाºयांशी संगनमत करून पदाचा दुरुपयोग केला. आदिवासींना वाटप करण्यासाठी असलेले एच. डी. पाईप, सायकल, क्रेशर मशीन, शिलाई मशीन, कृषी अवजारे आदी साहित्य पूर्ण लाभार्थ्यांना वाटप न करता ते वाटप केल्याचे दाखविले. एवढेच नव्हे तर त्यांनी याबाबतचे कोणतेही रेकॉर्ड सांभाळून ठेवले नसल्याचे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले.या अहवालानुसार देशमुख यांनी तब्बल ५९ लाख ३० हजार १७२ रुपयांची शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी प्रकल्प विकास अधिकारी दिलीप नारायण खोकले यांनी १७ जुलै रोजी देशमुख आणि तत्कालीन कार्यालयीन अधिकारी, कर्मचा-यांविरोधात सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ए. के. मोरे करीत आहेत.निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशीयाप्रकरणी दिलीप देशमुख यांनी पदाचा दुरुपयोग करून शासनाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची चौकशी शासनाच्या आदेशाने माजी न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड यांनी करून अहवाल शासनास सादर केला. या चौकशीतही देशमुख यांच्या अपहाराचा पर्दाफाश झाला.
आदिवासींच्या योजनेत ५९ लाखांचा घोटाळा; अधिकाऱ्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 1:39 AM