लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधेमुळे रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होत आहे. शिवाय आधुनिकतेमुळे अनेक गरजूंना जीवनदान मिळत आहे. जिल्हा रूग्णालयातर्फे गतवर्षांपासून महाअवयवदान अभियान राबविले जात असून आतापर्यंत ५९० जणांनी अवयवदान तर ७९० दात्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. २४ दात्यांचे नेत्र प्रत्यारोपण केले आहे.जिवंत अथवा मृत झाल्यानंतर मानवी शरीरातील अवयव दुसºया व्यक्तीला देणे म्हणजे अवयवदान होय. अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून मृत्यूनंतर प्रत्येकजन अवयव दान करू शकतो. अंतिम टप्प्यातील ज्यांचे अवयव निकामी झाले आहेत, अशा अनेक रुग्णांचे प्राण अवयवदानामुळे वाचवता येतात. ज्या रुग्णाचे अवयव कायम निकामी झाले त्यांच्यासमोर एकमेव अवयवदान हाच एक आशेचा किरण असतो. त्यामुळे प्रत्येकांनी सर्वश्रेष्ठदान महाअवयव दान करण्याचे आवाहन जिल्हा रूग्णालयातर्फे केले जात आहे. शिवाय २९ ते ३० आॅगस्ट दरम्यान, जिल्हाभरात महाअवयव व नेत्रदान अभियान राबविले जात आहे. शिबिरांचे आयोजन करून नागरिकांना अवयव व नेत्रदानाविषयी माहिती सांगून जनजागृतीचा संदेश पोहोचविण्याचे काम रूग्णालयाची टीम करीत आहे. ‘जीते जीते रक्तदान, जाते जाते अवयवदान, और जाने के बाद नेत्र और देहदान’ या ब्रीद वाक्यानुसार सध्या महाअभियान राबविले जात असून दात्यांचे अर्ज भरून घेतले जात असल्याचे समुपदेशक सुविधा खिल्लारे यांनी सांगितले.अवयव व नेत्रदानाविषयी माहिती दिली जात असून अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तर जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली अवयव दान जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
५९० दात्यांनी केला अवयवदानाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 11:50 PM