औरंगाबाद : ऑर्बिट इलेक्ट्रोमेट इंडिया कंपनीत भागीदार करण्याचे आमिष दाखवून कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाने सोनालिका मेटल कॉर्पोरेशन कंपनीकडून वारंवार स्टीलची खरेदी केली. त्या बदल्यात पैशाऐवजी स्वतःच्या कंपनीत ५० टक्के भागीदारी देण्याचे आमिष दाखवून ६ कोटी ७८ लाखांची फसवणूक करून भामटा पसार झाला. याप्रकरणी २३ फेब्रुवारी २०२१ रोजी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. वर्षभरानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ‘एमडी’ला छत्तीसगड राज्यातील भिलाई येथून आरोपीला अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांनी दिली.
अनिल राजदयाल राय (वय ४०, रा. वाळूज) असे आरोपीचे नाव आहे. देवराम संताराम चौधरी (३६) यांची सोनालिका मेटल काॅर्पोरेशन नावाची वाळूज एमआयडीसीत कंपनी आहे. २०१७ मध्ये वाळूज एमआयडीसी भागातील ऑर्बिट इलेक्ट्रोमेट इंडिया प्रा.लि. कंपनीचा एम. डी. अनिल राय याने चौधरी यांच्या कंपनीकडून वेळोवेळी स्टेनलेस स्टीलची खरेदी केली. राय याने खरेदीच्या बदल्यात पैसे न देता चौधरी यांना ऑर्बिट कंपनीत ५० टक्के भागीदारी आणि कंपनीचे १ लाख २५ हजार शेअर्स देण्याची थाप मारली. तसेच संचालकपदाच्या नियुक्तीचे पत्र दिले. त्यानंतर रायने चौधरी यांना संचालकपदाची प्रक्रिया ऑनलाईन असल्याने ती पूर्ण होण्यास दोन-तीन दिवसांचा वेळ लागेल. त्यामुळे तुम्हाला मुंबईहून येथे प्रत्येकवेळी येणे शक्य होणार नाही, असे सांगून ऑर्बिट इलेक्ट्रोमेक इंडिया प्रा. लि. कंपनीच्या दहा कोऱ्या लेटरपॅडवर व चेकवर चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. त्यानंतर राय याने कोऱ्या लेटर पॅडवर केलेल्या स्वाक्षऱ्यांचा दुरुपयोग करून चौधरी यांना ऑर्बिट कंपनीच्या संचालक पदावरून परस्पर काढून टाकले. तसेच चौधरी यांच्या नावे असलेले ३५ लाख रुपये किमतीचे १ लाख २५ हजार शेअर्स परस्पर स्वतःच्या नावे केले. चौधरी यांच्या स्टेनलेस स्टीलचे ६ कोटी ४३ लाख रुपये व शेअर्सचे ३५ लाख असे एकूण ६ कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक करून भामटा फरार झाला होता.
छत्तीसगडच्या भिलाई कारागृहातून आणलेवर्षभरापासून आर्थिक गुन्हे शाखा पोलीस रायच्या शोधात होती. मोबाईल सीडीआरवरून तो छत्तीसगडच्या भिलाई येथे असल्याचे दिसले. त्यावरून भिलाई पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला. तेव्हा राय हा दोन फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेत असून सध्या भिलाईच्या दुर्ग मध्यवर्ती कारागृहात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक तृप्ती तोटावार, पोलीस नाईक विठ्ठल मानकापे, संदीप जाधव, बाबासाहेब भानुसे यांनी राय याला ताब्यात घेऊन औरंगाबाद येथे आणले.
परराज्यातही अनेकांना फसवलेअनिल राय याने बँक, स्टील विक्रेते, स्क्रॅब विक्रेते यांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्या विरुद्ध एमआयडीसी वाळूज व सिडको पोलिसांत तीन गुन्हे, छत्तीसगड येथे दोन तर गुजरातच्या वडोदरा येथे दोन गुन्हे असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्याविरुद्ध धनादेश अनादराचे खटले न्यायालयात सुरू आहेत.