औरंगाबाद : भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) हाॅलमार्किंग युनिक आयडी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात सोमवारी औरंगाबाद सराफ असोसिएशनतर्फे एक दिवसीय बंद पाळण्यात आला. शहरातील ४५० सह जिल्ह्यातील १५०० सराफ प्रतिष्ठाने बंद राहिली. त्यातून सहा कोटींची उलाढाल ठप्प झाली.
सराफांच्या बंदमुळे नेहमी गजबजून राहणाऱ्या सराफा बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला.
१६ जूनपासून रत्न आणि दागिने उद्योगावर अनिवार्य हाॅलमार्किंग लागू केले आहे. मात्र, बऱ्याच समस्या अद्याप सोडविल्या नाहीत. बीआयएसने दागिन्यांच्या शुद्धतेच्या चार प्रमाणित शिक्क्यांमध्ये अचानक बदल करताना ज्वेलरी उद्योगांच्या संस्थांबरोबर चर्चाही केली नाही. याविरोधात संप पुकारण्यात आला. सराफा व्यावसायिकांनी हाॅलमार्किंग प्रणालीचे स्वागत केले आहे. मात्र, हाॅलमार्किंग युनिक आयडी ही प्रक्रिया ज्वेलरी उद्योगासाठी विनाशकारी प्रक्रिया असून, ती सध्याच्या हाॅलमार्किंगच्या दागिन्यांना कोणतीही सुरक्षा प्रदान करत नसल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. दुकानाचे लायसन्स रद्द करणे, पाच ते दहापट दंड, सर्च वारंट, माल जप्त, एक वर्ष कारावास, अशा बीआयएसच्या तरतुदीही जाचक आहेत. यातून ज्वेलरी उद्योगावर इन्स्पेक्टर राज येईल, अशी ओरड होत आहे. शिवाय ही प्रक्रिया ग्राहकांच्या व्यक्तिगत गोपनीयतेचा भंग करणारी आहे. त्यामुळे त्यास विरोध करण्यासाठी बंद पाळण्यात आल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.
१०० टक्के बंद
आमचा हाॅलमार्कला विरोध नाही, तर हाॅलमार्किंग युनिक आयडीला विरोध आहे. यातील तरतुदी घातक आहेत. त्यामुळे एक दिवसीय बंद पाळण्यात आला. बंदला औरंगाबाद जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील पाच ते सहा कोटींची उलाढाल या बंदमुळे ठप्प झाली.
- राजेंद्र मंडलिक, अध्यक्ष, सराफ असोसिएशन