औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगावजवळील मानकर वस्तीवर दरोडा टाकणाºया ६ दरोडेखोरांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.एस. कुलकर्णी यांनी प्रत्येकी ५ वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड ठोठावला.२९ सप्टेंबर २०१६ च्या मध्यरात्री वरील दरोडेखोरांनी मानकर वस्तीवरील गुलाब लक्ष्मण मानकीकर यांच्या घरावर दरोडा टाकून घरातील सदस्यांना लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले. महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने ओरबडून घेतले आणि कपाटातील रोख ५ हजार आणि मोबाईल, असा एकूण ३० हजार रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला होता.दरोडेखोर पळून जाताना वेरूळ येथील भोसले चौकामध्ये नाकाबंदीत अडकले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली व अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळ मोबाईल, रोख रक्कम आणि सोन्याचा ऐवज आढळून आला. पोलिसांनी दरोडेखोरांना ताब्यात घेतले. गुलाब मानकीकर यांच्या तक्रारीवरून खुलताबाद पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३९५ अन्वये सहा दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता बी.आर. लोया यांनी २१ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. न्यायालयाने शिरू ऊर्फ फैयाज सुकनाशा काळे (३२), शिवाजी शिवराम काळे (२३), किशोर सुकनाशा काळे (२५), किशोर खंडू काळे (२०, सर्व रा. माळी बाभूळगाव, ता. पाथर्डी) आणि महंमद रसूल पठाण (३५, रा. मोहरी पाथर्डी), गफ्फार अब्दुल रहेमान अक्तार (३५, रा. पाथर्डी) यांना भा.दं.वि. कलम ३९५ अन्वये वरीलप्रमाणे शिक्षा व दंड ठोठावला.
मानकर वस्तीवर दरोडा टाकणाऱ्या ६ दरोडेखोरांना सश्रम कारावास व दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:15 PM