- लालखाँ पठाणगंगापूर (जि. औरंगाबाद) : तब्बल ६० टक्के ग्रामस्थ रोजगाराच्या शोधात बाहेर पडल्यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गंगापूर तालुक्यातील बोलठाण हे गाव ओस पडले आहे. काम करू शकणार नाहीत, असे वृद्ध तेवढेच गावात शिल्लक आहेत. १०० घरांचे आणि ७०० ते ८०० लोकसंख्येचे हे गाव. गावात सर्वच शेतकरी अल्पभूधारक आहेत. पाऊस पडतो आणि वाहून जातो. निचरा होणारी जमीन नसल्याने पाणी मुरत नाही. त्यामुळे पाणीपातळी खोलवर गेली आहे. नऊ एकराचे धनी असलेले रामनाथ पवार म्हणाले की, ‘पाऊस नसल्यामुळे खरीप पीक हातचे गेले. एकरी २० क्ंिवटल बाजरी होत असे. आता किती किलो होईल हे सांगता येत नाही. अजून एक वर्षाचा कालावधी लोटायचा आहे. हा काळ कसा जाणार ते देवालाच ठाऊक.’अकरा वर्षांपूर्वी याठिकाणी पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात आले. या योजनेचा काहीच फायदा झाला नाही. परिसरात काही विहिरींना थोडेफार पाणी आहे. त्यावर नागरिकांची व जनावरांची तहान भागत आहे. ते किती दिवस पुरेल ठाऊक नाही. गावापासून ४ किलोमीटर अंतरावर शिवना नदी वाहते. तीही कोरडी आहे. पावसाळा असतानाच ही स्थिती. उन्हाळ्यात काय होईल, हा प्रश्न आहे. पिण्यासाठी पाणी नाही. पिकांना पाणी नाही. जनावरे कसे सांभाळणार म्हणून अनेकांनी जनावरे विकून टाकली. शेतात काम नाही आणि पीकही शिल्लक राहिले नाही. रेशनचे धान्य व टँकरचे पाणी यावरच उदरनिर्वाह होत असल्याचे कदीर गफूर शेख यांनी सांगितले.>७२ गावांना ७७ टँकरगंगापूर तालुक्यात आॅक्टोबरमध्येच पाणीटंचाई जाणवत आहे. तालुक्यातील ७२ गावांसाठी ७७ टँकर आताच सुरू असून, दररोज १५४ खेपांच्या माध्यमातून गावकºयांची तहान भागविली जात आहे.नुकसान भरून येणे अशक्यखरिपाचे नुकसान भरून येणे शक्य नाही. आता पाऊस झाला तरीही रबीत गव्हासारखे पीक येणे अशक्य आहे.- व्यंकट ठक्के (कृषी अधिकारी, गंगापूर)
रोजगाराच्या शोधात ६० टक्के गाव झाले रिकामे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 4:40 AM