छत्रपती संभाजीनगर : २५ ते ३० टक्के ओलावा असताना आम्ही सोयाबीन विकले. त्यावेळी दसऱ्यादरम्यान शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले असते तर शेतकऱ्यांना फायदा झाला असता. आता केंद्र सरकारने १५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमी भावाने खरेदी करा, असे आदेश दिले. दुसरीकडे अजूनही खरेदी केंद्राचे शटर उघडले नाही. ६० टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले, आता आदेशाचा काय फायदा?’ असा प्रश्न गोपालपूर येथील सुरेश वडेकर या शेतकऱ्याने उपस्थित केला.
जाधववाडीतील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी मका विक्रीसाठी शेतकरी आले होते. यातील अनेकांना मका विकून गव्हाची पेरणी करायची आहे. १५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी करा, असा केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश रविवारी जाहीर करण्यात आला. यात सर्व प्रकारच्या सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे. या निर्णयाचे स्वागत शेतकऱ्यांनी केले. पण हा निर्णय दसऱ्याच्या काळात घेतला असता तर सोयाबीन उत्पादकांना फायदा झाला असता, असेही त्यांनी नमूद केले.
आडत व्यापारी हरीश पवार यांनी सांगितले, शेतकऱ्यांनी सुरुवातील ३० टक्के ओलसर सोयाबीन ३ हजार रुपये प्रतिक्विंटल दरम्यान विकले. आता बाजारात १८ ते १९ टक्के ओलसर असलेले सोयाबीन ३५०० ते ४१०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे.
...तरच शिल्लक सोयाबीनला फायदाकेंद्र सरकारने सोयाबीनला हमीभाव ४ हजार ८१२ रुपये दिला आहे. शेतकऱ्यांना गहू पेरणीसाठी रक्कम हवी. अजूनही निम्म्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक आहे. शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी लवकर शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे.- लालाजी वडेकर, शेतकरी, गोपालपूर