औरंगाबाद : कोरोना रुग्ण गंभीर झाला की सरळ घाटीत रेफर, अशी अवस्था कोरोनाच्या पहिल्या लाटेपाठोपाठ दुसऱ्या लोटत पाहायला मिळाली. गंभीर रुग्णांनी घाटीतील खाटा भरून गेल्या. खाटांअभावी अपघात विभागात एका बेडवर दाेन ते तीन रुग्ण ठेवण्याची वेळ ओढवली होती. मात्र, अवघ्या महिनाभरात दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांत ६० टक्के घट झाली आहे. परिणामी, आता नाॅन काेविड रुग्णांची संख्या वाढत आहे.
घाटी रुग्णालयात गेल्या महिनाभराच्या तुलनेत सध्या दाखल असलेल्या गंभीर रुग्णांची संख्या ४० टक्के आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव तीन महिन्यांनंतर ओसरला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या भीतिपोटी अनेकांनी नियमित उपचार पुढे ढकलण्यावर भर दिला, परंतु आता नियमित उपचारासाठी येणाऱ्या नाॅन काेविड रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नाॅन काेविड रुग्णांसाठी खाटांचे नियोजन करण्याची वेळ घाटी प्रशासनावर ओढवली आहे. घाटीत कोरोना रुग्णसंख्येत घट झाली असून, आता इतर आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ.सुरेश हरबडे यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयातही कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. या ठिकाणी दुसऱ्या लोटत ३०० कोरोना रुग्ण एकाच वेळी भरती होती, परंतु आजघडीला केवळ २९ रुग्ण दाखल आहेत. यात केवळ ६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.एस.व्ही. कुलकर्णी यांनी दिली.
-----
५ मे रोजी घाटीतील स्थिती
एकूण कोरोना रुग्ण-६०२
सामान्य स्थिती-१२९
गंभीर स्थिती-४७३
----
५ जून रोजी घाटीतील स्थित
एकूण कोरोना रुग्ण-२४२
सामान्य स्थिती-५७
गंभीर स्थिती-१८५
------
२,१५६ रुग्ण मृत्यूच्या तावडीतून बाहेर
घाटी रुग्णालयात गेल्या ३ महिन्यांत तब्बल २ हजार १५६ रुग्ण बरे झाले. घाटीत दाखल होणारे बहुतांश रुग्ण हे गंभीर अवस्थेत दाखल होतात. त्यांच्या उपचारासाठी घाटीतील डाॅक्टर, परिचारिका आणि कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. यातूनच जवळपास दोन हजार रुग्ण एक प्रकारे मृत्यूच्या तावडीतून सुखरूप बाहेर पडले.
-----