औरंगाबाद : सातारा-देवळाई भागातील ७५ हजारांहून अधिक नागरिकांना पाणी, ड्रेनेज या दोन मूलभूत सुविधा देण्यासाठी ६०० कोटी रुपये लागणार आहेत. महापालिकेने नियुक्त केलेल्या यश इनोव्हेटिव्ह या पीएमसीने नुकताच प्रकल्प आराखडा मनपा प्रशासनाला सादर केला. पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी ३५० कोटी, तर ड्रेनेज यंत्रणा उभी करण्यासाठी २५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पीएमसीने ६०० कोटींचा आराखडा प्रशासनाकडे सादर केल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी आज दिली.
सातारा-देवळाईचा मनपात तीन वर्षांपूर्वी समावेश झाला. तीन वर्षांत मनपाने या भागात फक्त बोटावर मोजण्याएवढे पथदिवे लावले आहेत. बाकी विकासकामे काहीच सुरू झालेली नाहीत. सातारा देवळाई मिळून सुमारे ७५ हजार लोकसंख्या असून, ५० हजार मालमत्ता आहेत. या भागात पाणी, ड्रेनेज, रस्ते, पथदिवे या मूलभूत सुविधा नाहीत. या भागात मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रकल्प आराखडा तयार करण्याचा निर्णय मनपाने घेतला.
सर्वसाधारण सभेत डीपीआर तयार करण्यास मंजुरी घेतल्यानंतर या कामासाठी प्रकल्प सल्लागार संस्था म्हणून यश इनोव्हेटिव्ह या संस्थेची नियुक्ती केली. पीएमसीने तीन महिन्यांत सर्वेक्षण करून डीपीआर तयार केला आहे. पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी ३५० कोटींचा आराखडा केला असून त्यामध्ये दोन मुख्य लाईन, चार जलकुंभ, दोन पंप, जलशुद्धीकरण केंद्राचा समावेश आहे. भूमिगत गटार योजना राबविण्यासाठी २५० कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्यात एसटीपी प्लांटचा समावेश करण्यात आला आहे.
शिवाजीनगर ते एन-३ रस्ता अपूर्ण; देवळाई-सातारावासीयांना वळसाशिवाजीनगर ते सिडको एन-३ ला मिळणारा रस्ता अर्धा किलोमीटर रखडल्याने देवळाई व साताऱ्यातील नागरिकांना सिडको बसस्थानक गाठताना सेव्हन हिलमार्गे वळसा घालावा लागतो. अधिकारी व कर्मचारी येथे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून, दुचाकीने कार्यालय व घर गाठताना गंभीर वाहतूककोंडीच्या फेऱ्यात अडकावे लागत आहे. ही वर्दळ कमी करण्यासाठी शिवाजीनगरातून मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनकडे जाणारा चारपदरी रस्ता केवळ अर्धा किलोमीटर रखडलेला आहे. सिडको एन-३ मार्गे रस्ता रेल्वे रुळापर्यंत पूर्ण आहे, शिवाजीनगरपासून कॉलेजपर्यंत रस्ता चारपदरी सिडकोने तयार केला आहे; परंतु काही अंतरावरील रस्ता रखडल्याने सिडको व जालना रोडवर येण्यासाठी वळसा घालून ये-जा करावी लागते.