जालना : जिल्ह्यात केवळ १५ टक्के पावसाची नोंद असली तरी शेतकऱ्यांनी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत ६१ टक्के पेरण्यांची कामे पूर्ण केली आहेत. तीळ, सूर्यफुलाची पेरणी सर्वात कमी आहे. जिल्ह्याचे खरीप हंगामाचे क्षेत्र सरासरी ५ लाख ६१ हजार ३६० हेक्टर एवढे आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणीचे प्रमाण केवळ १५ टक्के होते. त्यातही दुबार पेराची वेळ येणार का, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये वर्तविण्यात येत होती. दरम्यानच्या काळात एक-दोन वेळा बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना वेग दिला. आतापर्यंत ३ लाख ३४ हजार ७८ हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्षात पेरणी झाली आहे. मात्र पाऊस पुन्हा गायब झाल्याने शेतकरी चिंतित आहेत.जिल्ह्यात कापाशीची १ लाख ७२ हजार ९०० हेक्टरमध्ये तर सोयाबीनची पेरणी ३८ हजार २७० हेक्टरमध्ये झाली. ज्वारीचे सरासरी क्षेत्र ७१८ हेक्टर असून प्रत्यक्षात ७२ हेक्टर क्षेत्रातच पेरणी झाली. त्याची टक्केवारी केवळ १० टक्के आहे. बाजरीचे सर्वसाधारण क्षेत्र ४७ हजार ३०० असून ९ हजार ७०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी २१ टक्के आहे. मक्याची एकूण ६० टक्के पेरणी झाली. मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र ६० हजार १०० हेक्टर आहे. प्रत्यक्षात ३६ हजार २०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. तूर, उडीद व मुगाचे अनुक्रमे ५२, ३९ व ३४ टक्के इतकी पेरणी झाली. तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ४८ हजार हेक्टर आहे. त्यापैकी २४ हजार ९०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. उडदाचे सरासरी क्षेत्र १५ हजार २०० हेक्टर आहे. त्यापैकी केवळ ६ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. मुगाचे सर्वसाधारण क्षेत्र ३५ हजार ६०० हेक्टर असून १२ हजार १०० हेक्टर क्षेत्रात त्याची पेरणी झाली. भुईमुगाची सर्वसाधारण क्षेत्रापैकी ५० टक्के पेरणी झाली आहे. तिळाची ३ टक्क्यांवरच पेरणी आहे. सूर्यफुलाचे क्षेत्र ३ हजार २०० हेक्टर असून प्रत्यक्षात केवळ ३०० हेक्टरमध्येच पेरणी झाली. उसाच्या लागवडीचे सर्वसाधारण क्षेत्र २० हजार ४०० हेक्टर आहे. त्यापैकी १ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष लागवड झाली. (प्रतिनिधी)बळीराजा चिंतित गतवर्षी पावसाचे प्रमाण १२० टक्के होते. त्यामुळे यंदा वरुणराजा साथ देईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र जुलै महिना जवळपास संपल्यानंतरही केवळ १५ टक्केच पावसाची नोंद असल्याने बळीराजा चिंतित आहे. किमान पेरणी वाया जाऊ नये, अशी आशा आहे.गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांना फटका दिला. आता पावसाअभावी पिकांची उगवणच झालेली नाही. त्यामुळे दमदार पाऊस पडावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. आॅगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज काही जाणकार शेतकरी व्यक्त करीत आहेत.
जिल्ह्यात ६१ टक्के पेरणी
By admin | Published: July 30, 2014 12:40 AM