छत्रपती संभाजीनगर : वॉशिंग सेंटरवर आलेल्या गाडीचालकाचा मोबाईल चोरून त्यातील फोनपेद्वारे एका आईस्क्रीमवाल्याच्या फोनपेवर चोरीचे ६४ हजार रुपये पाठविणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी २४ तासात बेड्या ठोकल्या. या दोघांकडून गाडीमालकाचे ७४ हजार ९०० रुपयांसह मोबाईल हस्तगत केल्याची माहिती निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.
फैयाज शहा साबेर शहा, अमोल खरात अशी आरोपींची नावे आहेत. निरीक्षक पोतदार यांनी दिलेल्या माहितीनुसार १७ मार्च रोजी शिवाजी क्षीरसागर यांची गाडी वॉशिंगसाठी फैयाज शहा यांच्या सेंटरमध्ये लावली होती. गाडी वॉशिंग झाल्यानंतर क्षीरसागर यांनी फोनपे द्वारे २५० रुपये शहा यास दिले. तेव्हा त्याने क्षीरसागर यांचा पासवर्ड पाहिला. त्यावेळी अमोल खरात हा सुद्धा तेथे होता. त्याच दिवशी सायंकाळी फैयाज याने शिवाजी क्षीरसागर यांना फोन करून वॉशिंग केलेल्या गाडीमध्ये त्यांचे काही सामान राहिले असल्याची बतावणी करून बोलावून घेतले.
त्याठिकाणी बोलत असतानाच आरोपी अमोल खरात याने क्षीरसागर यांची नजर चुकवून मोबाईल चोरला. त्यानंतर अंधाराचा फायदा घेत तो पळून गेला. त्याच्या पाठोपाठ फैयाज हा सुद्धा निघुन गेला. या दोघांनी मोबाईलमधील फोन पे मधून पैसे काढण्यासाठी ओयासीस चौकातील कैलास चंद्रा गुर्जरयाच्या आईस्क्रीमच्या गाडीवर आले. त्याच्याकडून आईस्क्रीम, बाजूवाल्याकडून भेळ खाऊन त्याचे बिल देताना ६४ हजार आणि ९०० रुपये क्षीरसागर यांच्या फोन पे मधून पाठविले. गुर्जर यांनी जास्तीचे पैसे आल्याचे सांगताच दोघांनी मोबाईल हॅग झाल्याचा बनाव केला. तसेच गुर्जरच्या फोनपे मधून फैयाज याच्या फोनपेमध्ये पैसे ट्रान्सफर करून घेतले.
दोघांनी असे घेतले पैसे वाटूनचोरलेले पैशातील ४० हजार अमोल खरात तर ३४ हजार ९०० रुपये फैयाज याने आपसात वाटून घेतले. पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर कोठडीत त्यांनी पैशाची कबुली दिली. ही कारवाई निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक विनायक शेळके, सहायक उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, हवालदार सातदिवे, कैसर पटेल, प्रदीप ससाणे, कपील खिल्लारे, मुरमुरे यांनी केली.