औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बृहत आराखड्यानुसार नवीन महाविद्यालयांसाठी ९१ संस्थांनी प्रस्ताव दिले होते. यातील ६५ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित २६ प्रस्ताव प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्या अध्यक्षतेखालील अधिष्ठाता मंडळाने फेटाळले आहेत. हे प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या मंजुरीनंतर राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
औरंगाबाद शहर आणि ग्रामीणमधून ५३ महाविद्यालयांचे प्रस्ताव आले होते. बीड जिल्ह्यातून ८, तर उस्मानाबाद जिल्ह्यातून ५ प्रस्ताव सादर झाले होते. औरंगाबादपाठोपाठ सर्वाधिक २५ प्रस्ताव जालना जिल्ह्यातून आलेले होते. या महाविद्यालयांमध्ये संलग्नता समितींमार्फत पाहणी करण्यात आली होती. संलग्नता समितीच्या पाहणी अहवालानुसार बहुतांश महाविद्यालयांकडे पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे आढळले आहे.
शिवाय सर्वेक्षणातील निष्कर्षात महाविद्यालयांचे प्रस्ताव बसत नसल्यामुळे अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत ९१ पैकी २६ प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत. चारही जिल्ह्यांतील ६५ महाविद्यालयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, आता २८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीसमोर ठेवले जाणार आहेत.
व्यवस्थापन परिषदेच्या मंजुरीनंतर राज्य सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी ६५ प्रस्ताव पाठवले जाणार आहेत. बहुतांश महाविद्यालयांमध्ये वर्गखोल्या, प्रयोगशाळा, खेळाचे मैदान आणि ग्रंथालये उपलब्ध नसल्याचे आढळले आहे. या बैठकीला प्रभारी अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. मजहर फारुकी आणि डॉ. संजवनी मुळे यांची उपस्थिती होती.