उस्मानाबाद : जिल्हाभरातील शेतकऱ्यांची रबी पिकांच्या काढणीची लगबग सुरू असतानाच बुधवारी सायंकाळी साधारणपणे पाच वाजेच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागत वादळी वाऱ्यासह पाऊस अन् गारपीटही झाली. या पावसामुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागाही अक्षरश: उद्ध्वस्त झाल्या आहेत. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार सुमारे ६ हजार ५७२ हेक्टवरील पिकांना ‘अवकाळी’ फटका बसला आहे. यामध्ये ज्वारी ३ हजार ६२५, गहू १ हजार ४७२, हरभरा १ हजार ५७६, द्राक्ष सोळा, आंबा चोवीस, कांदा बारा, टरबूज-खरबूज तीस आणि २१ हेक्टवरील भाजीपाल्याचा समावेश आहे. झाडे उन्मळून पडलीलोहारा : शहरासह तालुक्यातील होळी, आष्टाकासार, रेबे चिंचोली, सालेगाव, माकणी, सास्तुर, खेड, बेंडकाळ, मार्डी, नागराळ, मोघा परिसरात बुधवारी सायंकाळी अवकाळी पाऊस झाला. लोहारा मंडळामध्ये १३ मिमी, माकणी १२ मिमी तर जेवळी मंडळामध्ये ५ मिमी पाऊस झाला आहे. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. होळी येथे झाडे उन्मळून पडली तसेच घरावरील पत्रे उडाली. त्याचप्रमाणे शेतशिवारातील ज्वारी, हरभरा, गहू द्राक्ष, आंबा आदी पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील होळी व परिसरात प्रचंड गारपीट झाली. पिकांसोबतच घरांचेही प्रचंड नुकसान झाले. गावातील अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. विद्युत पोलही मोडले आहेत. त्याचप्रमाणे गावातीलच बाबू वचने, समिंदर पाटोळे यांच्या घरावर झाड उन्मळून पडले. त्यामुळे घराचे मोठे नुकसान झाले आहे. महात्मा गांधी विद्यालयावरील पत्रे डाली आहेत. कास्ती (बु.) येथील शेतकरी मुरलीधर चव्हाण, व्यंकट चव्हाण तसेच नागूर येथील मोरे यांच्या शेतातील आंब्याच्या बागांनाही मोठा फटका बसला आहे. काढणीस आलेली आणि काढून ठेवलेली ज्वारी भिजल्यामुळे काळवंडली आहे. त्यामुळे हाता तोंडाला आलेल्या पिकांवर या अवकाळी पावसाने पाणी पडले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.जागजी मंडळात १९ मिमी पाऊसतेर : उस्मानाबाद तालुक्यातील जागजी मंडळामध्ये जवळपास १९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या अनेकांच्या शेतात हरभरा, गहू, ज्वारी पिके असून या पिकांना मोठा तडाखा बसला आहे. उंबराव त्रिंबक सावंत यांच्या शेतातील ज्वारी पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. अशीच अवस्था अन्य शेतकऱ्यांची आहे. विष्णू सावंत यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे घरातील धान्य भिजले आहे. हनुमंत नामदेवराव देशमुख यांच्या अडीच एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागेलाही फटका बसला आहे. गारांच्या माऱ्यामुळे द्राक्षांचे घड तुटून पडल्याचे पहावयास मिळाले. भिकार सारोळा परिसरातील गहू, ज्वारी, हरभरा आदी पिके अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाली आहेत. एवढेच नाही तर पळसप येथील हरिश्चंद्र माळी यांच्या शेतातील गव्हाचे पीक पूर्णत: वाया गेले आहे. ज्वारी, गव्हाचे अंथरून झाले आह. तेर परिसरातही यापेक्षा काही वेगळे चित्र नाही. ज्वारी, गहू, हरभरा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यामुळे आता नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे करण्याची गरज निर्माण झाली आहे.कांद्यालाही फटकातुळजापूर : अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके मातीमोल झाली आहेत. गारांच्या माऱ्यामुळे द्राक्षाचे घड तुटले आहेत. एवढेच नाही तर द्राक्षांना काळे डाग पडू लागले आहेत. अशीच परिस्थिती आंब्याची झाली आहे. झाडाला लगडलेले आंबे गळून पडले आहेत. ज्वारी, गहू, हरभरा आदी रबी पिके शेतकऱ्यांनी मळणीसाठी कापून ठेवली होती. परंतु, या पावसामुळे ही पिके पूर्णत: भिजली असून ती काळी पडण्याची भिती शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. कांद्याचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढून शेतातच ठेवला होता. हा कांदाही भिजला आहे. दरम्यान, वरिष्ठ स्तरावरून पंचनामे करण्याचे आदेश आले असले तरी तालुक्यातील अनेक कर्मचारी मात्र, शेतकऱ्यांकडून शेतसारा, शिक्षण कर वसुलीमध्ये मग्न असल्याचे पहावयास मिळते. तुळजापूर (खुर्द) येथील महिला शेतकरी भागिरथीबाई भगवान भोजने यांच्या अडीच ते तीन एकरावरील द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे. विष्णू गाटे यांच्या चार एकरावरील कांदा पिकाला फटका बसला. दत्ता जगदाळे यांच्या तीन एकरावरीेल कापणी करून ठेवलेली ज्वारी भिजल्याने काळवंडली आहे. दरम्यान, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पंढरपूरहून लातूरकडे जात होते. या मार्गावरील पिकांच्या नुकसानीची पहाणी करतील, असे अपेक्षित होते. परंतु, नुकसानीची पहाणी न करताच ते पुढे निघून गेले. या प्रकाराबाबत शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, नुकसानीच्या पंचनाम्याच्या अनुषंगाने तहसीलदार दिनेश झांपले यांच्याशी संपर्क साधला असता, तुळजापूर तालुक्यात कमी प्रमाणात अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे फारशे नुकसान झाले नसल्याचे ते म्हणाले. उमरगा तालुक्यातील बलसूर परिसरालाही अवकाळी पावसाने झोडपून काढले. परिसरातील रबी पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. रबी पिकांसोबतच फळ बागांचेही नुकसान झाल्याचे पहावयास मिळाले.
६५७२ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त!
By admin | Published: March 17, 2017 12:30 AM