उस्मानाबाद : केंद्र शासनातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने दोन वर्षापूर्वी घेतला होता. मात्र, जिल्ह्यातील ६६ महाविद्यालयांनी यासाठी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज समाजकल्याण विभागाला पाठविलेच नसल्यामुळे ६८७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकली नाही. याची गंभीर दखल घेत समाजकल्याण अधिकाऱ्यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व ईतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमानुसार केंद्रशासनाने विहित केलेल्या दराने निर्वाह भत्ता तसेच कनिष्ठ / वरिष्ठ महाविद्यालयाने शिष्यवृत्ती, शिक्षण फीस, परिक्षा फीस वितरित करण्यासाठी ‘इ-शिष्यवृत्ती’ योजना कार्यान्वित केली. मात्र, विद्यार्थ्यांच्याक हिताच्या या योजनेला महाविद्यालयांच्या उदासीन धोरणामुळे खीळ बसत आहे. काही महाविद्यालयांनी अद्याप विद्यार्थ्यांचे अर्जच पाठविले नसल्याने संबंधित लाभार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत.दरम्यान, या योजनेच्या अनुषंगाने मुंबई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीतही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच संबधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून खुलासा मागवून प्रलंबित अर्जाबाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना समाजकल्याण अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यावर समाजकल्याण विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. यात सन २०१३ -१४ या आर्थिक वर्षात पात्र विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. परंतु, विद्यार्थ्यांनी भरलेले आॅनलाईन अर्ज महाविद्यालयांनी अद्याप समाजकल्याण विभागाकडे पाठविलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागले आहे. यामध्ये जिल्ह्यातील ६६ महाविद्यालयांतील ६८७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत ‘समाजकल्याण’ने संबंधित ६६ प्राचार्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. (प्रतिनिधी)
६६ प्राचार्यांना ‘कारणे दाखवा’
By admin | Published: June 22, 2014 11:15 PM