जालना : जिल्ह्यातील कृषीपंप धारकांसह घरगुती ग्राहकांकडे असलेल्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली असून, ३० आॅक्टोबरपर्यंत ६९९० कृषीपंपांची वीजजोडणी तोडण्यात आली आहे. त्यांच्याकडे ४३ कोटी ६५ लाख ५७ हजार रुपयांची थकबाकी आहे. ऐन रबी हंगामात पाण्याची गरज असताना वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने शेतक-यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.उत्पन्न व खर्च यात प्रचंड तूट निर्माण झाल्याने महावितरणकडून संपूर्ण राज्यभरात थकबाकीदारांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कृषीपंपधारकांकडे जवळपास ४४ कोटी आणि घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीज ग्राहकांकडे ३४ कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरूनच आदेश आल्याने जिल्ह्यात धडक कारवाई सुरू करण्यात आल्याचे अधीक्षक अभियंता अशोक हामने यांनी सांगितले. वारंवार सूचना देऊनही याकडे करणा-यांची वीज जोडणी तोडण्यात आल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले. पंधरा-पंधरा दिवसांची मुदत देऊनही ग्राहकांनी थकबाकी भरलेली नसल्याचे धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात तीन वर्षांपासून ६९९० वीजपंप ग्राहकांकडे ४३ कोटी ६५ लाख ५७ हजार रुपयांची थकबाकी आहे. पैकी ४६२ ग्राहकांनी १८ लाख ६५ हजार रुपयांची थकबाकी भरली आहे. त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. तर दुसरीकडे २० हजार ८५३ घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहक असून, त्यापैकी ४४८९ ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २ कोटी ५३ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. उर्वरित १५ हजार ६८३ ग्राहकांकडे ३३ कोटी ३० लाख ३० हजार रुपयांची थकबाकी आहे. त्यांच्यावर आगामी काळात कारवाई केली जाणार असल्याचे जालना विभागाचे अधीक्षक अभियंता अशोक हामने यांनी सांगितले.................................जालना, परतूर, जाफराबाद थकबाकीत पुढेजिल्ह्यातील जालना, परतूर आणि जाफराबाद हे तीन तालुके थकबाकीत आघाडीवर असल्याचे महावितरणची आकडेवारी सांगते. जाफराबाद तालुक्यातील ९४७ कृषीपंप धारकांकडे ८ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी आहे. जालना तालुक्यातील १६६० ग्राहकांकडे ४ कोटी ४७ लाख, तर परतूर तालुक्यातील ११६० ग्राहकांकडे ११ कोटी ८४ लाख ७४ हजार रुपयांची थकबाकी आहे. याच्या वसुलीसाठी महावितरणने वीजतोडणीची कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यातील ६६९० कृषीपंपांची वीज तोडली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:29 PM