औरंगाबाद : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर सध्या ६७ हजार ८७८ मजूर आहेत. आता उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली असून विभागात हळूहळू रोहयो मजूरांच्या संख्येत वाढ होत आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विभागात ६७ हजार ८७८ नागरिक रोहयोच्या कामावर होते. दोन महिन्यात २५ हजारांनी मजुरांची संख्या वाढली असून बीड जिल्ह्यात जास्तीचे मजूर आहेत. प्रत्येकाच्या हाताला काम देण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. १८ लाख ४६ हजार मजूरांच्या हाताला काम देता येईल, असे नियोजन प्रशासनाने केलेले आहे.
खरीप हंगामातील पिकांचे गेल्यावर्षी अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. रब्बी हंगामातही अवकाळीचे सावट कायम आहे. शेतीवरील या संकटामुळे हाताला काम मिळविण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक मनरेगाकडे वळत असल्याचे वाढलेल्या आकडेवारीवरून दिसते आहे. बीड आणि हिंगोली जिल्ह्यात मजुरांच्या संख्येत वाढ झाली आहे. नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही मजुरांची संख्या आठ हजारांपेक्षा जास्त झाली आहे. आगामी काळात मजुरांची आकडेवारी व कामांची संख्या वाढणे शक्य आहे.
मागील वर्षी रोजगार हमी योजनेवर मोठ्या प्रमाणात मजूर संख्या होती. त्यातच पावसाळा देखील थोडा लांबला होता. दुष्काळ परिस्थिती, पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती व रोजगाराचे दुर्भिक्ष्य यामुळे नागरी स्थलांतरणही वाढले होते. या सगळ्यांवर मात म्हणून रोजगार हमी योजनेची कामे ग्रामपंचायत पातळीपासून सुरू करण्यात आली होती.
जिल्हानिहाय मजुरांची संख्या जिल्हा मजूरांची संख्याऔरंगाबाद ५१४७जालना ४१४०परभणी ३७२६हिंगोली १३७४१बीड १६६०२नांदेड ९९२१उस्मानाबाद ८२६६लातूर ६३३५एकूण ६७८७८