औरंगाबाद : शहरातील तिन्ही मतदारसंघांतून बुधवारी सात जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून प्रत्येकी दोघांनी, तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून तिघा जणांनी उमेदवारी अर्ज भरले. दरम्यान, पितृपक्ष संपल्यामुळे उद्यापासून प्रमुख उमेदवारही आपले उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. औरंगाबाद मध्य मतदारसंघातून प्रकाश गायकवाड यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर किस्मतवाला शेख खाजा यांनी गरीब आदमी पार्टीच्या वतीने उमेदवारी दाखल केली. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काझी सय्यदोद्दीन जहीर अहमद यांनी उमेदवारी दाखल केली. याच मतदारसंघातून आज नगरसेवक मधुकर सावंत यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून मोबीनोद्दीन खदीरोद्दीन सिद्दीकी आणि शेख रफिक शेख रज्जाक या दोन अपक्षांसह तिघा जणांनी उमेदवारी अर्ज भरले. तसेच पैठण मतदारसंघातून शैलेश रणपिसे आणि रियाज शेख बादशहा शेख या दोघांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, गंगापूर आणि वैजापूर मतदारसंघांत मात्र आज एकही उमेदवारी अर्ज आला नाही. विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.मात्र, पितृपक्ष सुरू असल्यामुळे आजपर्यंत तुरळक उमेदवारांनीच आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आता पितृपक्ष संपला आहे. त्यामुळे उद्या गुरुवारपासून उमेदवारांची भाऊगर्दी होणार आहे. प्रमुख पक्षांचे उमेदवार उद्या आणि परवा उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे.
शहरातील तीन मतदारसंघांत ७ जणांचे अर्ज
By admin | Published: September 25, 2014 1:00 AM