छत्रपती संभाजीनगर : बोगस बिलाद्वारे खरेदी दाखवून ७ कोटी ६ लाखांची करचुकवेगिरीचा पर्दाफाश राज्य जीएसटी विभागाने केला आहे. यासंदर्भात शहरातील ट्रेडलाइन कंपनीचे मालक नौशाद अली अहमद अली काझी यास अटक करण्यात आली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीस १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
यासंदर्भात राज्य जीएसटी विभागकडून प्राप्त माहितीनुसार, ट्रेडलाइन कंपनीविरोधात वस्तू व सेवा कर विभागाकडून अन्वेषण कारवाई सुरू करण्यात आली होती. सदर व्यापाऱ्याने खोट्या बिलाद्वारे खरेदी दाखवून ७ कोटी ६६ लाखांची चुकीची कर वजावट घेतली, तसेच मालाच्या कुठल्याही देवाण-घेवाणीशिवाय फक्त खोटी बिले देऊन ७ कोटी ६ लाखांचा शासनाचा महसूल बुडविला. खोटी बेले देणे व घेणे दोन्हीही वस्तू व सेवा कर कायदा, २०१७ अंतर्गत दंडनीय अपराध आहे. सहायक राज्य कर आयुक्त नितेश भंडारी व प्रकाश गोपनर (अन्वेषण शाखा) यांनीही कारवाई केली. यात राज्यकर निरीक्षक व कर सहायक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दोन महिन्यांत तीन आरोपींना अटकराज्य वस्तू व सेवा कर विभाग कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेत आहेत. २०२४-२५ या आर्थिक वर्षातील पहिल्या दोन महिन्यांत करचुकवेगिरी करणाऱ्या तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात विभागाला यश आले आहे. करचुकवेगिरी करणाऱ्यांविरोधात विभागाने मोहीम उघडली आहे.