नांदेड : बीसीमध्ये पैसे गुंतवणुकीस प्रोत्साहन देवून ७ लाख ८० हजारांची गुंतवणूक केल्यानंतर वेळेत पैसे न देवून तिघाजणांची फसवणूक केल्या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील चीटफंड कार्यालयात कौठा येथील प्रविण सत्यनारायण काकाणी, हिंगोली गेट येथील विनोद उत्तमराव गायकवाड आणि सुनंदा विनोद गायकवाड यांना आरोपींनी चिटफंड बीसीमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास प्रोत्साहीत केले. त्यांना सदस्य करुन घेवून २२ नोव्हेंबर २०१८ पासून त्यांच्याकडून नियमित हप्ते घेतले. यांनी प्रत्येकी २ लाख ६० हजार रुपयांची गुंतवणूक चिटफंड बीसीमध्ये केली होती. मुदत संपल्यानंतर काकाणी आणि गायकवाड दांपत्यांनी रक्कमेची मागणी केली असता आरोपीतांनी त्यांना पैसे न देता शिवीगाळ केली. या प्रकरणी प्रविण काकाणी, सुनंदा गायकवाड व विनोद गायकवाड यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार वजिराबाद ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक बडे हे करीत आहेत.