गंगापूर (जि. औरंगाबाद) : बीड जिल्ह्यातील गेवराई येथील बेरोजगार तरुणाला शासकीय नोकरीचे आमिष दाखवून ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात ६ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
गेवराई येथील शहेबाज हमीद शेख याला त्याच्या ओळखीतील गंगापूर येथील अब्बास शेख यांनी जानेवारी २०२१ मध्ये घरी बोलावून सिल्लोड येथील सय्यद मुस्तफा सय्यद याच्यासमोर सांगितले की, मी माझ्या मुलाला पणन महासंघात नोकरी लावली आहे. तुलाही बांधकाम किंवा आरोग्य विभागात नोकरी लावतो. त्याकरिता दहा लाख रुपये लागतील. या आमिषाला बळी पडून शहेबाजने दोन लाख रुपये बँकेमार्फत भूषण (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्या खात्यावर ८ जानेवारी २०२१ रोजी जमा केले. त्यानंतर १५ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रधान सचिव, आरोग्य विभाग यांच्या आदेशाने व सही शिक्क्यानिशी फिर्यादीसह आणखी दोघांच्या नावे बनावट नियुक्ती पत्र अब्बास शेख यांच्या सांगण्यावरून दिनेश लहिरे (अहमदनगर जिल्हा कचेरीत नोकरीस) याने दिले. तसेच त्याने ओळखपत्र देऊन प्रशिक्षणाकरिता हजर होण्याचे पत्र देऊन उर्वरित रकमेची मागणी केली. त्यामुळे ३१ मार्च २०२१ रोजी शहेबाजच्या वडिलांनी अहमदनगर येथे कुलकर्णी नावाच्या व्यक्तीला एक लाख रुपये दिले. तसेच सिद्धार्थ कांबळे या व्यक्तीच्या नावे व आरोपींनी सांगितलेल्या वेगवेगळ्या खात्यावर एकूण ७ लाख रुपये टप्प्याटप्प्याने दिले.
तगाद्यानंतर बनावट नियुक्तीपत्र टेकवलेशहेबाजने नियुक्ती पत्राची मागणी केल्यानंतर तुला बांधकाम विभागात नोकरी लावून देतो, असे आरोपींनी सांगितले. त्यानंतर पाठपुरावा करूनही आरोपी टाळाटाळ करीत असल्याने शहेबाजने पोलिसांत तक्रार देतो, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी त्याला बनावट नियुक्तीपत्र दिले. परिणामी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने आरोपीकडे पैशांची मागणी केल्यानंतर त्याला लहिरे यांनी २४ मार्च २०२२ रोजी दीड लाख रुपये पाठविले. उर्वरित रक्कम देण्यास मात्र टाळाटाळ केली. त्यामुळे ६ ऑगस्ट रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात शाहबाजने तक्रार दिली. त्यावरून अब्बास बाबूमिया शेख ऊर्फ रेडिओवाले अब्बास पटेल (रा. समतानगर, गंगापूर), सय्यद मुस्तफा सय्यद जहांगीर (रा. सहारा सिटी, सिल्लोड), आदित्य कुलकर्णी (रा. वाशी, मुंबई) व दिनेश बबन लहिरे ऊर्फ तांबे (रा. अहमदनगर) या चार आरोपींविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.