अजिंठा : अजिंठा येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर दुसºयाच्या नावावर परीक्षा देणा-या ७ तोतया परीक्षार्थींसह १५ जणांवर अजिंठा पोलिसांनी मंगळवारी गुन्हे दाखल केले. हा धक्कादायक प्रकार अजिंठा येथील नेहरू मेमोरियल उर्दू हायस्कूलमधील केंद्रसंचालक सय्यद मुनिरोद्दीन सय्यद आरिफोद्दीन यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला.बारावी परीक्षेच्या हॉल तिकीटमध्ये बदल करून चक्क दुसºयाच्या जागी परीक्षा देणारे रॅकेट अजिंठ्यात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. केंद्र संचालकांच्या तक्रारीवरून तब्बल १५ जणांविरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील सहा विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.सुरुवातीचे दोन्ही पेपर ज्या विद्यार्थ्यांचे मूळ हॉल तिकीट होते त्यांनी परीक्षा दिली. मात्र, सोमवारी सेक्रेटरी कॉमर्स विषयाचा पेपर होता. हा पेपर अवघड असल्याने त्या विद्यार्थ्यांनी हॉल तिकिटीवरील फोटो बदलून दुसºया विद्यार्थ्यांना (डमी) परीक्षेला बसविले. परीक्षा देताना पर्यवेक्षकांनी बोर्डाकडून मिळालेली यादी व मूळ हॉल तिकीट तपासले असता ७ विद्यार्थी तोतया असल्याचे निदर्शनास आले. पर्यवेक्षकांनी ही माहिती केंद्र संचालक सय्यद मुनिरोद्दीन सय्यद आरिफोद्दीन यांना दिली. त्यांनी लगेच अजिंठा पोलिसांना माहिती देऊन सहा जणांना त्यांच्या ताब्यात दिले. यापैकी एक परीक्षार्थी पसार झाला. सर्व मूळ विद्यार्थी हळदा येथील नूतन महाविद्यालयाचे आहेत.मूळ विद्यार्थी...उपाध्याय प्रिया मनोजकुमार, पूनकर स्नेहल मिलिंद, तरे सोनाली सुरेश, वाल्मीक सूरज संतोष, साबळे अक्षय शिवाजी, म्हस्के नीलेश शिवाजी, विश्वकर्मा प्रतीक गोलाई (सर्व रा. ठाणे जिल्हा).तोतया विद्यार्थी...सबीया अजित तडवी (१९), रुक्साना उस्मान बरडे (१९) दोघी रा. पळासखेडा, ता. जामनेर), ज्योती सांडू हिवाळे (२०, रा. उंडणगाव), शरीफ सलीम तडवी (२०), रहिम मानखॉ तडवी (२२, रा. दोघे रा. रावेर), साबेर तुकाराम सुरवडे (२४, रा. सामरोद, ता. जामनेर), भिकन बाबू तडवी (गोंद्री, ता. जामनेर). यातील सहा जणांना पोलिसांनी अटक केली असून भिकन बाबू तडवी हा पोलिसांना चकमा देऊन पसार झाला. मूळ सात परीक्षार्थी व त्यांच्या जागेवर बसलेले सात तोतया परीक्षार्थी व शिक्षक मेढे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.उत्तरपत्रिका जप्त...सहायक पोलीस निरीक्षक किरण आहेर, फौजदार अर्जुन चौधर यांनी या सहा विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बनावट हॉल तिकीट, ओळखपत्र, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका जप्त केल्या. ज्या शिक्षकाच्या सांगण्यावरून हे तोतया परीक्षार्थी परीक्षेला बसले त्या मेढे नावाच्या शिक्षकाचाही पोलीस शोध घेत आहेत.ग्रामीण भागात गोरखधंदा...ग्रामीण भागातील महाविद्यालयात दहावी, बारावी व पदवी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी राज्यातील विद्यार्थी फक्त प्रवेश घेतात. यात नोकरी करत असलेल्यांचा जास्त समावेश असून परीक्षा पास करून देण्याची हमखास हमी मिळत असल्याने त्यांच्याकडून हजारो रुपये वसूल केले जातात. सिल्लोड तालुक्यात असे मोठे रॅकेट आहे. यात अजून कोण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
अजिंठा केंद्रावर ७ तोतया परीक्षार्थी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 1:07 AM