औरंगाबाद, दि. ५ : संस्थेचे नियमित लेखापरीक्षण न करणा-या जिल्ह्यातील 6968 संस्थांची नोंदणी धर्मादाय आयुक्तांनी रद्द केल्या आहेत. तसेच या संस्था चालकांना चौकशीसाठी बोलावण्यात आले असून अशा संस्थांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया होणार असल्याने या संस्था चालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
या बाबत पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले यांनी सांगितले, औरंगाबाद जिल्ह्यात नोंदणीकृत अशा जवळपास 30 हजार संस्था आहेत. यातील 6968 संस्थांच्या लेखापरीक्षणामध्ये अनियमितता दिसून आली आहे. अशा सर्वच संस्थांची मान्यता रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या रद्द झालेल्या संस्थांमध्ये धार्मिक संस्थांचा समावेश नाही. बहुतेक करून शाळा, दवाखाने , वाचनालये, व्यायामशाळा आदी संस्थांचा यात समावेश असल्याचे सहआयुक्त भोसले यांनी यावेळी सांगितले.
चौकशीसाठी बोलावणार रद्द झालेल्या या संस्था चालकांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. २३ ऑक्टोबर ते १९ डिसेंबर दरम्यान या संस्थांची चौकशी होणार आहे. यानंतर त्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरु होईल करण्यात येईल अशी माहिती सुद्धा त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली.