छत्रपती संभाजीनगर : दारूच्या व्यवसायात ७० लाख रुपये गुंतवले. त्याचा नफा काही काळ दिला खरा; पण, नंतर टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. युवकाने गुंतविलेले पैसे परत मागितले तेव्हा त्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्रस्त युवकाने सुसाईड नोट लिहून स्वत:च्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना १६ एप्रिल रोजी श्रेयनगरमध्ये घडली. या प्रकरणी १८ एप्रिल रोजी गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली.
आरोपींमध्ये अमित जगदीश खट्टर (रा. पुंडलिकनगर), जगदीश खट्टर (रा. जालना) आणि भानुदास सोनवणे (रा. मुकुंदवाडी) यांचा समावेश आहे. महेंद्रकुमार संजय गुंगे (३०, रा. श्रेयनगर) असे मृताचे नाव आहे. महेंद्रकुमारची आई रत्नप्रभा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुलगा महेंद्रकुमारने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याची मित्रांच्या माध्यमातून अमितसोबत ओळख झाली. अमितने त्याच्या दारूच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास महेंद्रकुमारला सांगितले. त्यानुसार त्याने सुरुवातीला १ लाख रुपये गुंतवले. त्याचा परतावा प्रतिमहिना १० हजार रुपये दिला. त्यामुळे त्याने पुन्हा ३ लाख गुंतवले, अशी वेळोवेळी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीची दोन वर्षे नफा दिला. २०२१ मध्ये अमित तुरुंगात गेला. त्यामुळे नफा मिळणे बंद झाले. अमितच्या वडिलांकडे पैशाची मागणी केली, तेव्हा त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली. अमितकडे पैशाची वारंवार मागणी केली. त्यानेही प्रत्येक वेळी टाळाटाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पुण्याच्या वाइन शॉपसाठी १० लाख घेतले५ नोव्हेंबर २०२२ रोजी अमित गुंगे यांच्या घरी आला. पुण्यातील वाइन शॉपचे काम होणार आहे. तुमचे अर्धे पैसे परत करतो, असे सांगितले. त्यासाठी १० लाख रुपये घेतले. सोबत महेंद्रकुमार होंडा कार (एमएच २० - एफजी ७८६५) घेऊन पुण्याला गेला. तेव्हा अमितने त्यास दारू पाजून बॉण्डवर सह्या करून घेत कार ताब्यात घेतली. तसेच पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे त्रस्त महेंद्रकुमारने आत्महत्या केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.