औरंगाबाद : शोध घेऊनही जागा मिळत नाही, जागा मिळालीच, तर हस्तांतरणाची डोकेदुखी कायम असल्याने जिल्ह्यातील तब्बल ७०० अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत उभारता आलेली नाही. त्यामुळे या अंगणवाड्यांना भाड्याच्या जागेत, ग्रामपंचायत कार्यालय परिसरात, जि.प. शाळांच्या व्हरांड्यात चालतात. विशेष म्हणजे, यापैकी ८२ अंगणवाड्या तर कुठे पारावर- मंदिरात भरवल्या जात आहेत.
अंगणवाड्यांच्या माध्यमातून ६ वर्षांपर्यंत बालकांना लसीकरण, पोषण आहार, आरोग्याच्या संदर्भ सेवा तसेच पूर्व प्राथमिक शिक्षण व बालसंस्काराचे धडे दिले जातात. अलीकडे तीव्र कुपोषित बालकांसाठी अंगणवाड्यांमध्ये ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. जवळपास ६०० अंगणवाड्यांमध्ये या केंद्रांच्या माध्यमातून बालकांना दर्जेदार पोषण आहार दिला जातो. त्यांच्यावर अंगणवाडी कार्यकर्ती- मदतनिसांच्या निगराणीत आरोग्य सेवा दिली जाते. आपल्या दर्जेदार सेवेच्या माध्यमातून जिल्ह्यात ११०० अंगणवाड्यांनी ‘आयएसओ’ मानांकनही पटकावले आहे, तर ८०० अंगणवाड्या अलीकडच्या काळात ‘स्मार्ट’ झाल्या आहेत. मात्र, असे असले तरी अजूनही ७०० अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नसल्यामुळे त्यांची घुसमट चालू आहे. दुसरीकडे, औरंगाबाद तालुक्यातील ३०, कन्नड तालुक्यातील ४, सिल्लोड तालुक्यातील १०, गंगापूर तालुक्यातील ४, पैठण तालुक्यातील १०, फुलंब्री तालुक्यातील २१ आणि खुलताबाद तालुक्यातील ३ अशा ८२ अंगणवाड्या चक्क उघड्यावर भरतात.
यासंदर्भात जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले की, निधी उपलब्ध असला तरी निर्विवाद जागेअभावी अंगणवाड्यांना इमारत बांधण्यास अडचणी येत आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात २ कोटी, तर २०१८-१९ मध्ये ३ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीतून २ कोटी ५० लाख रुपये नवीन इमारत बांधकामावर खर्च करण्याचे निर्देश आहेत. सध्या या दोन्ही आर्थिक वर्षात ५६ अंगणवाड्यांसाठी निर्विवाद जागा मिळाल्या आहेत. त्याठिकाणी लवकरच इमारत बांधकाम करण्यात येणार आहे. डिसेंबरअखेरपर्यंत आणखी निधी प्राप्त होणार आहे, असेही मिरकले यांनी सांगितले.
धोकादायक अंगणवाडीजिल्ह्यात अनेक अंगणवाड्या मोडकळीस आलेल्या आहेत. काही अंगणवाड्यांच्या छताचे पोपडे कोसळले आहेत, तर काही अंगणवाड्यांच्या भिंती, फरशा खचल्या आहेत. यापैकी खुलताबाद तालुक्यातील गंदेश्वर येथील अंगणवाडी तर अगदी विहिरीच्या कडेवरच उभारण्यात आलेली आहे. सध्या या अंगणवाडीच्या फरशा पोखरलेल्या असल्याची बाब जि.प. सदस्य एल. जी. गायकवाड यांना भेटीच्यावेळी निदर्शनास. त्या अंगणवाडीला सध्या कुलूप लावण्यात आले असून स्ट्रक्चर आॅडिटनंतर ती पाडण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.