औरंगाबाद : दिवाळी हा प्रकाशोत्सव असतो. महापालिकेच्या विद्युत विभागाने यंदा दिवाळीत शहरातील एकही पथदिवा बंद राहणार नाही, यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. मागील आठ दिवसांत बंद असलेले सर्व पथदिवे सुरू करण्यात आले. ७० हजार पथदिव्यांचा लखलखाट दररोज रात्री रस्त्यांवर पडत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता ए. बी. देशमुख यांनी दिली.
महापालिका प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिवाळीचे खास नियोजन करण्याची सूचना सर्व विभागांना दिली. प्रामुख्याने पाणीपुरवठा, पथदिवे आणि घनकचरा विभागाला कोणत्याही तक्रारी येणार नाहीत, याची काळजी घ्यावी असे सांगितले होते. त्यानुसार सर्व विभागांनी चांगले नियोजनही केल्याचे दिसून येत आहे. विद्युत विभागाने इलेक्ट्राॅन या खासगी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अगोदर कोणत्या भागात पथदिवे बंद आहेत, याचे सर्वेक्षण केले. त्यानंतर पथदिवे कोणत्या कारणामुळे बंद आहेत, याची माहिती घेतली. बहुतांश ठिकाणी केबलचा मुद्दा होता. काही ठिकाणी तर फक्त अर्थिंगमुळे दिवे बंद असल्याचे समोर आले. युद्धपातळीवर सर्व पथदिवे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.
सर्व नऊ झोनमधील ६०० पेक्षा अधिक पथदिवे रात्रंदिवस काम करून सुरू करण्यात आल्याचे देशमुख यांनी नमूद केले. दररोज रात्री मनपा आणि खासगी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत शहरातील प्रमुख रस्त्यांवर संयुक्तरित्या पाहणीही करण्यात येत आहे. एकही पथदिवा बंद दिसला तरी इलेक्ट्राॅनचा चमू दहा मिनिटांमध्ये पोहोचून दिवा सुरू करीत आहे. वसाहतींमधील अंतर्गत रस्त्यांवरील पथदिवा बंद असल्याची तक्रार प्राप्त होताच संबंधित चमू प्रतिसाद देत असून, अद्याप अशा प्रकारच्या तक्रारीही मनपाकडे नसल्याचे देशमुख यांनी सांगितले.