बिडकीन : पीक कर्ज घेण्यासाठी ७१ शेतकऱ्यांनी खोटी कागदपत्रे बँक ऑफ महाराष्ट्रच्या बिडकीन शाखेत दाखल करून १ कोटी ९ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. बँकेची फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार खरीप हंगामात महाराष्ट्र बँकेच्या बिडकीन येथील शाखेतून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. बँकेने पीककर्जाच्या कागदपत्रांची ऑनलाइन फेरतपासणी केली असता शेतकऱ्यांनी खोटी कागदपत्रे दाखल केल्याचे सत्य समोर आले.
या सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी लागणारी सर्व कागदपत्रे ऑनलाइन डाऊनलोड केली आहेत. त्या कागदपत्रांवर तलाठ्यांच्या सह्या व शिक्के मारण्यात आले. बँकेने ही कागदपत्रे सत्य असतील, असे गृहीत धरून पीक कर्ज मंजूर केले. मात्र, जेव्हा प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतीविषयक कागदपत्रांची ऑनलाइन तपासणी केली असता. जास्त पीक कर्ज मंजूर करण्यासाठी शेत जमीन क्षेत्र वाढविल्याचे उजेडात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी अन्य शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली त्यातही दस्तऐवजमध्ये चुकीच्या नोंदी केल्याचे आढळून आले. जास्तीची शेत जमीन दाखवून बँकेची फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना मूळ कागदपत्रे दाखल करण्यासाठी बँकेने नोटिसा पाठवल्या. त्यातील काही शेतकऱ्यांनी मूळ कागदपत्रे त्यातील निम्म्या शेतकऱ्यांनी रक्कम भरून आपले खाते बंद केले. मात्र, ७१ शेतकऱ्यांनी नोटीसला काहीच उत्तर दिले नाही. मूळ कागदपत्रे दाखल केली नाहीत. या शेतकऱ्यांनी १ कोटी ९ लाख ७१ हजार रुपयांची बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखाधिकारी अवयकुमार दुबे यांनी गुरुवार, ७ जानेवारी रोजी सायंकाळी बिडकीन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्या ७१ शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पंकज उदावंत पुढील तपास करीत आहेत.