छत्रपती संभाजीनगर : शहरात लहान-मोठे मिळून तब्बल ७२ नाले असून, त्यांची लांबी ११६ किलोमीटर आहे. १०० मजुरांसह ९ जेसीबींच्या साह्याने ४३ दिवसांत नालेसफाईचे शिवधनुष्य मनपा उचलणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यंदाही पावसाळ्यात नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागणार, हे एखाद्या मोठ्या पावसात समोर येईल. मेअखेरपर्यंत कामे पूर्ण होतील, असा दावाच अधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे नाले थातूरमातूर स्वरूपात तर स्वच्छ होणार नाहीत ना, अशी शंका आहे. कारण सफाईची पाहणी करण्यासाठी महापालिकेत ‘कारभारी’ही नाहीत.
नालेसफाईतील खाबूगिरी तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी संपविली. त्यामुळे कोट्यवधींच्या उधळपट्टीला ब्रेक लागला. यंदाही मनपाकडून साफसफाई सुरू करण्यात आली. ज्या पद्धतीने नाले सफाई करायला हवी, त्या पद्धतीने होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. नाल्याच्या दर्शनी भागातील केरकचरा काढण्यात येतो. नाल्यातील एक इंचही गाळ काढण्यात येत नाही. गाळ काढण्यासाठी कोट्यवधी रुपये लागतील, असा दावा प्रशासनाकडून दरवर्षी करण्यात येतो. शहरात मोठा पाऊस झाल्यास उखळ नाल्यांमुळे सखल भागात हाहाकार उडतो. यापूर्वी अनेकदा मोठा पाऊस झाल्यावर शहराची अवस्था मुंबईप्रमाणे झाली होती. शहरातील दहा मोठ्या नाल्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. नाल्यांमध्ये प्रचंड गाळ, केरकचरा आणि नाल्यांवर झालेल्या मोठमोठ्या अतिक्रमणांनी पाण्याचा नैसर्गिक प्रवाहच बंद झाला आहे.
इमारती, अतिक्रमणेशहरातील विविध नाल्यांवर खासगी संस्था, बँकांना १५ ठिकाणी इमारती उभारण्यात आल्या आहेत. याशिवाय अतिक्रमणेही शेकडोंच्या संख्येने आहेत. ही अतिक्रमणे काढण्याची हिम्मत प्रशासनाने कधीच दाखवली नाही. कारण यामागेही अनेकदा राजकारण आडवे येते. इमारत मालकांनीच त्यांच्या नाल्याखालील गाळ काढावा, अशी अट टाकण्यात आलेली आहे. मात्र, काही वर्षांत एकाही इमारत मालकाने नाला साफ केला नाही. त्यामुळे काही इमारतीखालून पाणी वाहणेच बंद आहे. पावसाळ्यात दलालवाडी व पैठणगेट परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरते.
३० टक्के काम झाल्याचा दावामे महिन्यातच नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. आठ दिवसांपूर्वी कामे सुरू करण्यात आली आहेत. आतापर्यंत ३० टक्के काम झाल्याचा दावा वॉर्ड अभियंत्यांनी बैठकीत केला. प्रत्येक प्रभागासाठी एक जेसीबी देण्यात आला आहे. ज्या नाल्यात जेसीबी जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी मजुरांमार्फत कामे सुरू आहेत. सुमारे शंभर मजूर आहेत. शहरात ७२ नाले आहेत. पैकी मोठ्या नाल्यांची संख्या १८ आहे. सोमवारी शहर अभियंता ए. बी. देखमुख यांनी नालेसफाईचा आढावा घेतला.
तर पैशांची मोठी बचत होईल नालेसफाईचे ‘मॅनेजमेंट’ परिपूर्ण पाहिजे. कामात अळंटळं नको, ऊन खूप असल्याने सकाळी ६ ते ११ आणि दुपारी ४ ते ७ या वेळेत काम करावे. शहरात ७२ नाले असले, तरी मोठे नाले खूप कमी आहेत. आतील कचरा, गाळ गाठून तो लवकर उचलला पाहिजे. मान्सूनपूर्वी काम होईल. अनेक ठिकाणी चांगले काम सुरू असून, पैशांची मोठी बचत होईल.- सी. एस. सोनी, निवृत्त शहर अभियंता, मनपा.
मे अखेर सफाई पूर्ण
मी अखेरपर्यंत काम संपविण्याचे नियोजन आहे. मनपा ही कामे करीत असल्याने ३ ते ४ कोटींची बचत होत आहे. कंत्राटीच्या तुलनेत हे काम अधिक चांगले होत आहे. मागील वर्षी कुटेही सखल भागात पाणी शिरल्याची तक्रार नव्हती.- बी. डी. फड, कार्यकारी अभियंता