औरंगाबाद : कोरेगाव-भीमाच्या घटनेचे सोमवारी सायंकाळपासून शहरात तीव्र पडसाद उमटले आणि बघता बघता तीन दिवस शहर तणावाखाली होते. विविध भागांत झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनांमुळे सोमवारी रात्रीपासून अलर्ट झालेल्या पोलिसांना ७२ तास बंदोबस्तासाठी रस्त्यांवर काढावे लागले.
संवेदनशील आणि चळवळीचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्या औरंगाबादेत सोमवारी सायंकाळपासून कोरेगाव-भीमा येथील घटनेचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. पीरबाजार, उस्मानपुरा येथून हजाराहून अधिक लोकांनी निषेध मोर्चा काढून क्रांतीचौक गाठले. अचानक रस्त्यावर आलेल्या या मोर्चेकर्यांना परवानगी नाकारली आणि तेथील एका शोरूमवर पहिला दगड फेकण्यात आला अन् तणावाला सुरुवात झाली. उस्मानपुर्यासह विविध भागांत दुकाने बंद झाली. या घटनेपासून अलर्ट झालेल्या पोलिसांनी एसआरपीची एक तुकडी सोबत घेऊन संवेदनशील भागात मोर्चा सांभाळला.
पोलीस अधिकारी, कर्मचारी सुट्या आणि रजा रद्द करून कर्तव्यावर हजर झाले. प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, उपायुक्त विनायक ढाकणे, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त, ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक आणि अन्य अधिकारी-कर्मचार्यांसोबत एसआरपीच्या चार कंपन्यांतील चारशे जवान सोमवारी रात्रीपासून ते आज गुरुवार सायंकाळपर्यंत रात्रंदिवस गस्तीवर होते. तब्बल ७२ तास पोलिसांना टुथ ब्रशही करता आला नाही. कोणता दगड कोठून येईल याचा नेम नसतो, ही बाब ओळखून डोक्यावर लोखंडी हेल्मेट ठेवून पोलिसांना मिळेल तो नाश्ता उभे राहूनच करावा लागला.
गेल्या काही दिवसांपासून पारा १० अंशांपर्यंत घसरला आहे. शहरवासी ऊबदार कपड्यात घरात आरामशीर झोपलेले असताना त्यांच्या जीवित आणि मालमत्तांचे रक्षण करण्यासाठी कडाक्याच्या थंडीत तीन रात्री पोलिसांनी जागून काढल्या. काही विशेष पोलीस अधिकार्यांनीही पोलिसांना याकामी मदत केली.
अन्नाची पाकिटेपोलिसांची रात्रंदिवस सुरू असलेली धावपळ पाहून मुकुंदवाडी येथील शिवसेना पदाधिकारी बाबासाहेब डांगे यांनी पोलिसांसाठी बुधवारी सकाळी नाश्त्याची पाकिटे वाटप केली. तसेच सिंधी कॉलनीतील गुरुद्वारातर्फे पोलिसांना सुमारे अडीच हजार अन्नाची पाकिटे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडविले. तर तरुणांच्या ग्रुपने पोलिसांना मोफत चहा व पाण्याच्या बाटल्या दिल्या.