अंबड : सातत्याने दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण असणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या १ कोटी ७९ लाख ९९ हजार ६१० रुपये खर्चाच्या एकूण ७२ कामांमध्ये अधिकारी व कंत्राटदारांनी संगनमताने मोठा भ्रष्टाचार केला असून, या संपूर्ण प्रकरणाची विशेष चौकशी पथक व गुणनियंत्रक पथकामार्फत सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. सातत्याने दुष्काळाच्या चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांची शेती टंचाईमुक्त करुन शेतकऱ्यांना दुष्काळमुक्त करण्यासाठी फडणवीस सरकारने मोठा गाजावाजा करुन जलयुक्त शिवार योजनेस सुुरुवात केली. जलयुक्त शिवार म्हणजे पाणलोट क्षेत्राचा विकास. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत १) पाणलोट विकासाची कामे, २) साखळी सिमेंट काँक्रीट नाला बंधाऱ्याची कामे नाला खोलीकरण/रुंदीकरण/ सरळीकरणासह करणे, ३)जुन्या जलसंरचनांचे पुनरुज्जीवन करणे, ४)अस्तित्वातील लघु पाटबंधारे संरचनाची (केटी वेअर/साठवण बंधारा) दुरुस्ती करणे. ५) पाझर तलाव, लघु सिंचन तलाव दुरुस्ती, नूतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे. ६)पाझर तलाव/गाव तलाव/साठवण तलाव/शिवकालीन तलाव/ ब्रिटीशकालीन तलाव/ निजामकालीन तलाव/माती नालाबांधातील गाळ काढणे. ७)मध्यम व मोठया प्रकल्पांचा सिंचन क्षमतेनुसार प्रत्यक्ष वापर होण्यासाठी उपाययोजना करणे. ८) छोटे ओढे/नाले जोड प्रकल्प राबविणे . ९) विहीर/बोअरवेल पुनर्भरण कामे. १०)उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर. ११) पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट करणे. १२)पाणी वापर संस्था बळकट करणे. १३) कालवा दुरुस्त करणे. अशा १३ प्रकारच्या कामांचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश आहे. या १३ प्रकारची कामे करुन पावसाचे जास्तीस जास्त पाणी गावाच्या शिवारातच अडविणे, गावातील भूगर्भातील जलपातळीत वाढ करुन गावांना दुष्काळमुक्त करण्याचा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. मात्र वरील १३ पैकी केवळ नदी नाल्यांचे खोलीकरण/रुंदीकरण/ सरळीकरण व कंपार्टमेंट बंडिंग ही भ्रष्टाचाराच्या दृष्टीने सोयीची असलेली दोन प्रकारचीच कामे अंबड तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेत करण्यात आली आहेत. अंबड तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या या ७२ कामांमध्ये अनेक तांत्रिक बाबींना सोयीस्करपणे वगळुन मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तक्रारदार घनश्याम शाहूराव साबळे व रमेश शशिकांत सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.
जलयुक्त शिवारच्या ७२ कामांमध्ये सावळा गोंधळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2017 11:37 PM