फुलंब्री तालुक्यातील चित्र : सोयाबीन, तूर, उसाच्या क्षेत्रात वाढ
फुलंब्री : तालुक्यात यंदा मृग नक्षत्रात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी लगेच खरिपाच्या पेरणीला सुरुवात केल्याने आतापर्यंत ७२ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. यात मका व कपाशीचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीन, तूर आणि उसाच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येते आहे.
तालुक्यात खरीप पिकाचे क्षेत्र ५७ हजार ५०० हेक्टर असून, यात ५३ हजार ९५८ इतके क्षेत्र पेरणीयोग्य आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा मका व कापशी पिकाचे क्षेत्र कमी करून सोयाबीन, तूर उस या पिकाला अधिक महत्व दिले आहे, तर अद्रक लागवडीचे क्षेत्र यंदा जैसे थे आहे. तालुक्यात एकूण क्षेत्रापैकी ४१ हजार ७९५ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. यंदा उसाची विक्रमी लागवड करण्यात आली आहे. तालुक्यात सरासरी उसाचे क्षेत्र ७५० हेक्टर असून, १,३४६ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. या लागवडीचा वेग पाहता येत्या सहा ते सात दिवसात शंभर टक्के खरीप पिकाची लागवड होण्याची शक्यता आहे. पण काही भागात पाऊस नसल्याने अडचणी येत आहेत.
--------------------------------
तालुक्यातील खरिपाचे क्षेत्र
- तालुक्यात खरिपाचे क्षेत्र ५७ हजार ७९५ हेक्टर
- पिकाची पेरणी ७२ टक्के
- मका १६,६०० हेक्टरपैकी १६,१९५
- तूर ४,२०० हेक्टरपैकी १,२१३ हेक्टर
- मूग ७०० हेक्टरपैकी ३३९ हेक्टर
- सोयाबीन ५०० हेक्टरपैकी ३००
- कापूस २३,६०० हेक्टरपैकी १८,४९५
- अद्रक २००० हेक्टरपैकी २,२१५
------------------------------------------------
सोयाबीन, तूर व उसाचे क्षेत्र वाढले
तालुक्यातील धरणे, नदी काठी असलेल्या फुलंब्री, सांजूळ, बिल्डा, पाल, कान्होरी, म्हसला, पाथ्री, वाकोद या गाव परिसरातील विहिरीत पाणी मुबलक असल्याने शेतकऱ्यांनी अद्रक व उसाची लागवड केली आहे. या लागवडीला १५ मेपासून सुरुवात झाली. यंदा शेतकऱ्यांनी मृगाच्या पावसानंतर सोयाबीन, तूर व उसाला पसंती दिल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
---------------------------------
240621\img-20210622-wa0152 (1).jpg
फोटो कॅप्शन
फुलंब्री तालुक्यातील निधोना परिसरात उगून आलेले मका पिक