लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : नाशिक जिल्ह्यात बुधवारी जोरदार पाऊस सुरू असल्याने तेथील धरण समूहातून होणारा विसर्ग मोठ्या क्षमतेने वाढविण्यात आला असून मध्यरात्रीपासून धरणात मोठी आवक होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सध्या धरणात २०६८८ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू असून धरणाचा जलसाठा ७२.४६ टक्के झाला आहे.धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता फक्त साडेपाच फूट पाणी लागणार आहे. वरील भागातून येणारी आवक लक्षात घेता जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची वेळ आल्यास त्या दृष्टीने जायकवाडी प्रशासनाने तयारी सुरू केली असून धरणाखालील चनकवाडी बंधाºयाचे १७ दरवाजे काढून घेण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील नांदूर -मधमेश्वर बंधाºयातून १२००० क्युसेक्स क्षमतेने होणारा विसर्ग सायंकाळी ५ वाजता ३०९०९ क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात आला तर अहमदनगर जिल्ह्यातील ओझर वेअरमधून सुरू असलेला ४००० चा विसर्ग बुधवारी ९८३३ क्युसेक्स क्षमतेने वाढविण्यात आला आहे. यामुळे बुधवारी मध्यरात्रीपासून धरणात ४५ हजाराच्या आसपास आवक होणार आहे, असे धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.बुधवारी रात्री ७ वाजता धरणाची पाणीपातळी १५१६.६६ फुटापर्यंत पोहचली होती. धरणात एकूण जलसाठा २३११.२०१ दलघमी (८१.६१ टीएमसी) तर उपयुक्त जलसाठा १५७३.०९५ दलघमी (५५ टीएमसी) एवढा झाला आहे. येत्या दोन दिवसात धरणाचा जलसाठा ८५ टक्क्यांपर्यंत जाईल, असे धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.
जायकवाडीत ७२.४६% पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:27 AM