छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयावरील आरोग्य सेवेचा ताण कमी करण्यासाठी महापालिकेची आरोग्य सेवा भक्कम करायला हवी, अशी ओरड नेहमी होते. मात्र, प्रत्यक्षात प्रशासन आरोग्य सेवा भक्कम करण्यासाठी किती गंभीर आहे, हे उघड झाले. नवीन आकृतीबंधात मनपात कायमस्वरूपी डॉक्टरांची ७४ पदे मंजूर आहेत. आजपर्यंत फक्त १० डॉक्टरांचीच पदे भरलेली आहेत. ६४ पदे अनेक वर्षांपासून रिक्त असून, १९ डॉक्टर कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेले आहेत.
महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आरोग्य विभागासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची ७४ कायम पदे मंजूर आहेत. त्यापैकी दहा पदांवर वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत, ६४ पदे रिक्त आहेत. १९ कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून त्यापैकी १७ वैद्यकीय अधिकारी कामावर आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञांची चार पदे आहेत, त्यापैकी एकाच पदावर स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध आहे.
पूर्णवेळ कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज लक्षात घेऊन २० वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीचा प्रस्ताव तयार करून तो शासनाला पाठवण्याचे आदेश प्रशासक जी. श्रीकांत यांनी आस्थापना विभागाला दिले आहेत, या विभागाकडून प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रस्ताव तयार झाल्यावर तो शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला जाईल. स्त्रीरोग तज्ज्ञांना शासनाच्या नियम व निकषानुसार महापालिकेच्या माध्यमातून केवळ साठ हजार रुपये पगार दिला जातो. स्त्रीरोग तज्ज्ञांनी खासगी दवाखान्यात सेवा दिली तर त्यांना दुप्पट किंवा तिपटीने पगार मिळू शकतो. पगारातील या तफावतीमुळे पालिकेच्या आरोग्य विभागाला स्त्रीरोग तज्ज्ञ मिळत नाहीत, असे डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.
कोट्यवधींचा खर्चमनपाने मागील वर्षभरात बन्सीलालनगर, सिल्क मिल कॉलनी, मेल्ट्रॉन, एन-११ आणि एन-८ येथील रुग्णालयांवर कोट्यवधी रुपये खर्च केले. ऑपरेशन थिएटर बांधले. आता तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. लवकरच तज्ज्ञ मिळतील. काही दिवसांत सेवा सुरू होतील, असा विश्वास मंडलेचा यांनी व्यक्त केला.