छत्रपती संभाजीनगर : राज्यात सध्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा चांगलाच बोलबाला सुरू आहे. घरबसल्या दरमहा दीड हजार रुपये अनुदान मिळणाऱ्या या योजनेने महिला सुखावल्या असून, आता पंतप्रधानांनी देशात ३ कोटी लखपती दीदी तयार करून महिलांना आर्थिक आणि सामाजिक स्तरावर सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात ७४ हजार महिलांना लखपती दीदी बनविण्याचा संकल्प केला आहे.
तथापि, लखपती दीदी म्हणजे काय, असा सर्वसामान्य महिला तसेच पुरुषांना पडलेला प्रश्न आहे. गेल्या काही वर्षांपासून महिला सशक्तीकरणावर शासनाचा विशेष भर आहे. महिलांची आर्थिक, सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा, हा उद्देश समोर ठेवून शासनाने लखपती दीदी ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना १ ते ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे. परंतु, लखपती दीदी ही योजना केवळ बचत गटाशी संबंधित महिलांसाठीच आहे.
महिलांमध्ये स्वयंरोजगाराची गोडी लागावी, असाही उद्देश या योजनेचा आहे. या योजनेंतर्गत निवडलेल्या उद्योगांसाठी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. त्यानंतर स्वत:चा उद्योग उभा करण्यासाठी त्यांना पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे. मात्र, लाभार्थी महिलेच्या घरातील एकही सदस्य शासकीय नोकरदार नसावा, तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा जास्त नसावे, अशाच बचत गटांशी संलग्न महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
कोणत्या बचत गटांच्या किती महिलांना संधी?या योजनेच्या निकषानुसार ज्या बचत गटांचे २५ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न आहे, त्या गटातील १२०६ महिला, ज्या गटांचे २५ हजार ते ६० हजारांपर्यंत उत्पन्न आहे, अशा गटांतील १६ हजार महिला, ६१ हजार ते १ लाखापर्यंतचे उत्पन्न आहे, त्या गटातील ४८,२४५ महिला आणि १ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या ८,२९० महिला, अशा एकूण ७३,७४१ महिलांना लखपती दीदी योजनेसाठी निवड केली जाणार आहे.