लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील मुख्य बाजारपेठेत सुरू असलेल्या सिमेंट रस्ते कामांमुळे परिसरातील व्यवसायावर ७५ टक्के परिणाम झाला आहे. रखडलेले काम गतीने पूर्ण करण्याची मागणी व्यापाऱ्यांतून होत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सिंधी बाजार, मामा चौक, फुल बाजार परिसरात गत दीड महिन्यांपासून रस्त्यांची कामे सुरू आहेत. परिसरातील डांबरी रस्त्यांऐवजी सुसज्ज असे सिमेंट रस्ते काम होत आहेत. मात्र या कामांमुळे व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याने व्यापाऱ्यांतून रमजान ईद असून या दरम्यान मोठी आर्थिक उलाढाल होते. रस्ते कामांमुळे व्यापाऱ्यांचे लाखो रूपयांचा व्यवसाय थांबला आहे. विशेषत: बाजार परिसरातील रस्त्यांची कामे संबंधित कंत्राटदाराने गतीने पूर्ण करण्याची गरज होती. रमजान ईदपूर्वी या रस्त्यांची कामे पूर्ण करण्याची मागणी व्यापाऱ्यांतून जोर धरत आहे. सिंधी बाजार परिसरातील व्यापारी जयप्रकाश मोटवाणी म्हणाले, गत बावीस दिवसांपासून रस्त्याची कामे सुरू आहेत. मात्र ही कामे संथगतीने होत आहेत. याचा व्यवसायावर ७५ टक्के परिणाम झाला आहे. रमजान ईद पूर्वी रस्ते होणे गरजेचे असल्याचे प्रकाश तलरेजा यांनी सांगितले. रस्ते खोदल्यामुळे नागरिक बाजारपेठेत येण्यास तयार नाही. आले तरी वाहन लावण्यासाठी जागा नाही. एकूणच मोठी आर्थिक उलाढाल थांबली आहे. कापड व्यापारी प्रशांत उबाळे यांनीही रस्त्यांची कामे कधी पूर्ण होणार असा सवाल करीत व्यापाऱ्यांसोबतच नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. रमजान ईद, शाळा उघडण्याचा काळ यामुळे नुकसान होत आहे. संबंधित विभाग तसेच कंत्राटदाराने हे काम तात्काळ करावे, असे म्हटले आहे.
रस्ते कामांमुळे व्यवसायावर ७५ टक्के परिणाम!
By admin | Published: June 19, 2017 12:13 AM