छत्रपती संभाजीनगर : ‘लाल परी,’ ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, लोकवाहिनी अशा अनेक नावाने एसटी बसची ओळख आहे. गेल्या ७५ वर्षांत ‘एसटी’ने काळानुरूप बदल केला आणि प्रवासी सेवेत ‘नंबर वन’चा मान टिकवला. कागदी तिकिटांऐवजी कंडक्टर आता मशीनद्वारे तिकीट देतात; परंतु त्या कागदी तिकिटांचे महत्त्व आजही अबाधित आहे. आजही या कागदी तिकिटांना ‘एसटी’त सोन्यासारखाच भाव आहे.
राज्यात पहिल्यांदा १ जून १९४८ रोजी पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर एसटी महामंडळाची बस धावली होती. सेवेची ७५ वर्षे पूर्ण करून यंदा एसटी अमृतमहोत्सवी वर्धापनदिन साजरा करीत आहे. एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाचे पहिले विभाग नियंत्रक म्हणून १ नोव्हेंबर १९५६ रोजी मेजर यू. जी. देशमुख यांनी धुरा सांभाळली होती. सध्या विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर असून, ते छत्रपती संभाजीनगरचे ३६ वे विभाग नियंत्रक आहेत. लाकडी बाॅडी आणि आजूबाजूला कापडी कव्हर असलेली बस, त्यानंतर लाल म्हणजे साधी बस, एशियाड, अश्वमेध बस, शिवशाही, शिवनेरी एमएस स्टील बाॅडीची बस आणि आता पर्यावरणपूरक अशी इलेक्ट्रिक बस ‘एसटी’च्या ताफ्यात दाखल झाली आहे. ज्येष्ठ आणि महिलांना देण्यात येणाऱ्या सवलतीमुळे एसटीला पुन्हा जुने दिवस येत आहेत.
कोट्यवधींच्या कागदी तिकिटांचा सांभाळमध्यवर्ती बसस्थानकात २ कोटी ५८ लाख १४०० रुपयांची, तर सिडको बसस्थानकात ४१ लाख ३ हजार २०० रुपयांची जुनी कागदी तिकिटे आहेत. याशिवाय प्रत्येक आगारांत, विभाग नियंत्रक कार्यालयातही जुनी तिकिटे आहेत. मशिन बंद पडल्यास या तिकिटांची मदत होते. विभागीय लेखाधिकारी सतीश दाभाडे, तिकीट शाखा लिपिक अशोक बोरुडे या तिकिटांचे नियोजन करतात.
प्रवासी सेवेला प्राधान्यविभागात आगामी काही दिवसांत ई-बसेसची संख्या वाढेल. निमआराम बसही मिळणार आहेत. नव्या लाल बसेसचीही संख्या वाढेल. प्रवासीसंख्येत वाढ होत असून, एसटीला प्रवाशांची पसंती वाढत आहे.- सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक
जिल्ह्यातील ‘एसटी’ची २०२२ ची स्थिती- एकूण एसटी - ५३६- रोज प्रवास - १ लाख ६० हजार किमी- राेजचे प्रवासी - ८० हजार- रोजचे उत्पन्न - ५५ लाख रुपये
जिल्ह्यातील ‘एसटी’ची २०२३ ची स्थिती- एकूण एसटी - ५४९- रोजचा प्रवास - १ लाख ९५ हजार कि.मी.- राेजचे प्रवासी - १ लाख ४० हजार- रोजचे उत्पन्न - ७० लाख रुपये