औरंगाबाद : शहरातील गारखेडा परिसरातील माणिकनगर येथील ७६ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी १ वाजता मृत्यू झाला. हा औरंगाबादेतील कोरोनाचा ६३ वा बळी ठरला.
गारखेडा परिसरातील सदर रुग्णावर १९ मे पासून उपचार सुरू होते. सदर रुग्णाचा कोरोनाचा अहवाल २१ मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. या रुग्णास पूर्वीपासून उच्च रक्तदाबाचा त्रास होता. हा रूग्ण व्हेंटिलेटरवर होता. उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
दरम्यान, दरम्यान, बुधवारी सकाळी तीन आणि दुपारी एक अशा चार बाधितांचा शहरात मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. सकाळी कोरोनामुळे इंदिरानगर-बायजीपुरा येथील ५६ वर्षीय पुरुष आणि हुसैन कॉलनीतील ३८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तर शहरातील मकसूद कॉलनीतील ६५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
इंदिरानगर- बायजीपुरा येथील रुग्णास २५ मे रोजी रात्री ११ वाजता घाटीतील अपघात विभागात दाखल करण्यात आले होते. त्यांना दम लागणे, ताप, खोकला ही लक्षणे होती. रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने व्हेंटिलेटर लावण्यात आले. परंतु रात्री ११.४० वाजता रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर २६ एप्रिल रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
हुसैन कॉलनी येथील रुग्णास २४ मे रोजी घाटीत दाखल करण्यात आले होते. त्यांचा अहवाल २५ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. उपचार सुरू असताना २६ मे रोजी रात्री ७.३० वाजता रुग्णाचा मृत्यू झाला.
खाजगी रुग्णालयात दाखल मकसूद कॉलनीतील रुग्णाचा २० मे रोजी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. रुग्णालयात दाखल झाल्यापासून रूग्ण व्हेंटिलेटरवर होता. रुग्णाला पूर्वीपासून उच्च रक्तदाबाचा त्रास होता. उपचार सुरू असताना बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णाच्या मृत्यूचे कारण कोविड न्यूमोनिया आणि मल्टी ऑर्गन फेल्युअर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. या ४ रुग्णांच्या मृत्यूमुळे औरंगाबादेत कोरोनाबाधित मयत रुग्णांची एकूण संख्या ६३ झाली आहे.