कळंब : शिक्षकांच्या मासिक वेतनास विलंब लागू नये म्हणून शिक्षण विभागाने शालार्थ वेतनप्रणाली अंमलात आणली आहे़ मात्र, तालुक्यातील ७६५ शिक्षकांचे जवळपास सव्वादोन कोटी थकले आहेत़ ऐन सणासुदीत वेतनास विलंब होत असल्याने शिक्षकांची आर्थिक हेळसांड होत आहे़कळंब तालुक्यात जिल्हा परिषदेच्या अख्त्यारित १३४ प्राथमिक , सात प्रशाला आहेत़ यात प्राथमिक शाळेत ६६९ तर प्रशालेत ९८ असे एकूण ७६५ शिक्षक कार्यरत आहेत़ या शिक्षकांच्या मासिक वेतनासाठी जवळपास सव्वादोन कोटीच्या आसपास निधीची आवश्यकता असते़ शिक्षकांच्या वेतनास विलंब होऊ नये, दप्तर दिरंगाई होवू नये म्हणून नवीन शालार्थ ही आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यास सुरूवात करण्यात आली़ असे असतानाही तालुक्यातील शिक्षकांचे वेतन रखडले आहे़ मुख्यापक साधारणत: प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेपर्यंत विहित नमुन्यात गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे आपली वेतन रक्कमेच्या मागणी नोंदवितात़ यावर पुढील कार्यवाही होऊन दोन तारखेपर्यंत शिक्षकांना या वेतन प्रणालीतून वेतन मिळणे अपेक्षित आहे़ परंतु आॅगस्ट महिन्यातील आॅनलाईन वेतन प्रक्रियेचे कामकाज पूर्ण न झाल्याने वेतन मिळालेले नाही.
सव्वादोन कोटी रुपयांची ७६५ शिक्षकांना प्रतीक्षा
By admin | Published: September 07, 2014 12:20 AM