कळंब : महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत आलेल्या ७७ लाखांचे कळंब तालुका कृषी कार्यालयाने नेमके केले काय? असा प्रश्न आता उपस्थित होवू लागला आहे. या कार्यालयाने ज्या कामांवर हा खर्च दाखविला त्यातील काही कामांच्या अस्तित्वावरच बोट ठेवले जावू लागले आहे.उन्मेष पाटील ल्ल कळंबतालुका कृषी कार्यालयाने आॅन रेकॉर्ड १७ गावातील बंधाऱ्यांच्या कामावर हे ७७ लाख रु. खर्चल्याचे कागदावर दाखविले आहे. हे काम कोणत्या गावात झाले याची माहिती कार्यालयाकडे आहे. परंतु ते कोणत्या क्षेत्रात झाले? त्याचा गट नंबर किंवा सर्व्हे नंबर काय आहे? याची स्पष्ट माहिती कृषी कार्यालयाकडे उपलब्ध आहे की नाही ही बाबही हे कार्यालय उघडपणे सांगत नाही. या अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामाचा कोणत्या गटनंबरमध्ये समावेश आहे, याबाबतची रंजक माहिती या कार्यालयाने दिली. उदाहरणार्थ एका गावामध्ये पाच बंधारा दुरुस्ती व गाळ काढण्याचे काम केले असतील तर गट नंबरमध्ये १,२,३,४,५, असे सरळ आकडे ठोकून दिले आहेत. ज्या गावात जेवढी कामे त्या ठिकाणी अशा प्रकारे त्या भागाचे गटनंबर टाकले आहेत. कृषी विभागाने या कामात अशी चलाखी केली असताना या कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाबच विचारला नसावा? की वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या ७७ लाखाच्या अभियानामध्ये सोईस्करपणे दूर्लक्ष केले, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सदरील कामांतील या सावळ्या गोंधळाची जिल्हा स्तरावरून चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.या अभियानांतर्गत १७ गावात ७३ बंधाऱ्यावर ही रक्कम खर्चल्याचे कृषी कार्यालयाचे म्हणणे आहे. परंतु काही गावात एवढे बंधारे आहेत का? की गटनंबर सारखे हे बंधारेही बोगस आहेत, असा सवाल उपस्थित होतो आहे. एखाद्या कामावर शासन लाखो रुपयाचा निधी देत असेल तर त्या कामांची खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असताना हा आंधळा कारभार चालतो कसा, ही बाब धक्कादायक आहे.सिमेंट बंधारा व माती नाला बांधकामाच्या दुरुस्ती व गाळ काढण्यासाठी फार फार तर २० ते ३० हजार रुपये खर्च आला असता असे या क्षेत्रातील मंडळीचे म्हणणे आहे. सिमेंट बंधाऱ्याचा गाळ काढण्यासाठी १० तास जेसिबी चालवून काम केले असले तरी ते १० हजार रुपये झाले असते. मग ही अंदाजपत्रके फुगविली कोणी? त्याचे दरपत्रक बनविले कोणी? त्याचे ओपन टेंडर का काढले नाही? ही बाबही प्रकर्षाने पुढे येत आहे. एकाच योजनेचे ७७ लाख रुपयाची माती होत असेल तर या कार्यालयाकडील इतर मोजनांचे आॅडिट करायला पाहिजे, असे सूर व्यक्त होत आहे.कळंब तालुक्यातील १७ बंधाऱ्यांवर ७७ लाख रूपये खर्च झाल्याची प्रशासनाच्या दप्तरी नोंद.४एका गावामध्ये पाच बंधारा दुरुस्ती व गाळ काढण्याचे काम केले असतील तर गट नंबरमध्ये १,२,३,४,५, असे सरळ आकडे ठोकून दिले आहेत. ४दुरूस्ती आणि गाळ काढणीवर हजारोंचा खर्च अपेक्षित असताना बहुतांश बंधाऱ्यांवर केला लाखोंचा खर्च.४दुरूस्तीच्या कामांच्या चौकशीसाठी जिल्हास्तरावरून समिती नेमण्याची ग्रामस्थांतून होतेय मागणी.दरम्यान, याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर तालुका कृषी कार्यालय खडबडून जागे झाले आहे. या प्रकरणाशी संबंधित माहिती अधिकाराखाली मागितलेल्या अपिलाची सुनावणी मंगळवारी करण्यात आली. या अधिकाऱ्यांशी संबंधित सर्व माहिती पाच दिवसात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय अपिलीय अधिकारी तथा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी अर्जदारांना लेखी स्वरुपात दिला.
७७ लाखांचे गौडबंगाल !
By admin | Published: November 12, 2014 12:23 AM