लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मृत वडील आणि वृद्ध आईच्या बनावट सह्या करून इच्छापत्र तयार करून त्याआधारे संपत्तीची परस्पर विल्हेवाट लावून फसवणूक केल्याप्रकरणी मातेने सातारा पोलीस ठाण्यात मुलाविरोधात गुन्हा नोंदविला.मंजूर खान मसूद खान (५५, रा. सिल्कमिल कॉलनी परिसर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. सातारा पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार खाजा बेगम मसूद खान (७७) यांचे पती २००१ मध्ये मरण पावलेले आहेत. त्यांना तीन मुली आणि पाच मुले आहेत. त्यांची ईटखेडा येथे जमीन आहे. त्यांच्या पतीच्या मृत्यूपश्चात त्यांचा मोठा मुलगा मंजूर खान याने वडिलांच्या आणि आईच्या बनावट सह्या करून इच्छापत्र तयार केले. या मृत्यूपत्राद्वारे त्याने त्याचा मित्र असलेल्या बिल्डरसोबत त्यांच्या जमिनीवर रो हाऊस, फ्लॅट, बंगलो बांधण्यासाठी करारनामा करून भागीदारी केली. यामुळे आरोपीने त्यांची आई आणि त्यांचे अन्य भाऊ व बहिणींचा विश्वासघात केला. २००४ ते २०१० या कालावधीत आरोपीने कोट्यवधी रुपयांची कमाई केली. ही बाब तक्रारदार यांना समजताच त्यांनी याविषयी त्यांना जाब विचारला असता त्याने या बदल्यात तक्रारदार यांना तीन कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली आणि याबाबतचा लेखी दस्त त्यांनी करून दिला; परंतु तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी एक रुपयाही दिला नसल्याचे तक्रारीत नमूद केले. अन्य भावंडांच्या भोळेपणाचा लाभ घेऊन आरोपीने त्याच्या भावासोबत संयुक्त बँक खाते उघडले; मात्र बँकेतून पैसे काढण्याचे अधिकार स्वत:कडेच ठेवले होते. २०१४ मध्ये तक्रारदार यांच्या किमती वस्तू आणि दागिने लॉकरमध्ये सुरक्षित ठेवतो, असे सांगून तो ते त्यांच्याकडून घेऊन गेला. हे दागिनेही त्याने परत केले नाहीत. उलट त्याविषयी विचारताच तक्रारदाराला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे खाजा बेगम यांनी पोलिसांना सांगितले. एवढेच नव्हे तर तक्रारदार यांच्या मुली आणि अन्य मुलांना फूस लावून त्याने २०१२ मध्ये संपत्तीबाबत हक्कसोड करून घेतले. मात्र तत्पूर्वीच आरोपीने संपत्तीची विल्हेवाट लावली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मंजूरखानविरोधात फसवणूक, विश्वासघात करणे, बनावट दस्त तयार करणे, कट रचणे, मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देणे आदी कलमानुसार गुन्हा नोंदविला. पोलीस उपनिरीक्षक सुशीला खरात तपास करीत आहेत.
७७ वर्षांच्या वृद्ध आईची मुलाने केली तीन कोटींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:56 AM