औरंगाबाद : रिक्षाचालकांनी पुकारलेल्या तीनदिवसीय बंदमुळे एस.टी.महामंडळ खडबडून जागे झाले आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी सोमवारपासून ७८ शहर बस चालविण्यात येणार आहेत. यासाठी चालक-वाहकांच्या उपलब्धतेसाठी सिडको बसस्थानकातील लांब पल्ल्याच्या प्रवासी वाहतुकीची जबाबदारी अन्य आगारांवर सोपविण्यात आली आहे.२१ ते २३ मार्चदरम्यान रिक्षाचालकांनी बंद पुकारला आहे. त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे एस.टी.महामंडळाने शहर बसच्या संख्येत आणि फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मीटर सक्तीच्या निर्णयामुळे १५ मार्चपासून शहर बसची संख्या २९ वरून ५१ करण्यात आली. या ५१ शहर बसेसद्वारे विविध मार्गांवर १ हजार २९ फेऱ्या करण्याचे नियोजन महामंडळाने केले. आता रिक्षा बंद आंदोलनामुळे शहर बसची संख्या ५१ वरून ७८ करण्यात येत आहे. ७८ बसेसद्वारे १ हजार ५४५ फेऱ्या करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी अन्य आगारांमधून चालक-वाहक येत आहेत. रिक्षा बंदमुळे एस.टी.ने जोरदार तयारी केली आहे.सिडको बसस्थानकातून धावणाऱ्या ग्रामीणसह लांब पल्ल्याच्या बसेसचे नियोजन अन्य आगारांवर देण्यात आले आहे. त्यामुळे केवळ शहर बससेवा सुरळीतपणे चालविण्यावर सिडको बसस्थानकाच्या अधिकाऱ्यांना लक्ष केंद्रित करता येणार आहे.
७८ शहर बसेस सेवेत
By admin | Published: March 20, 2016 11:50 PM