लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यामध्ये महावितरणचे ९२ हजार ८८० कृषीपंपधारक ग्राहक आहेत. त्यांच्याकडे महावितरणची ७८९ कोटी ३३ लाखांची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणला कृषीपंपाला वीजपुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.वीज वितरण कंपनीच्या जिल्ह्यातील २ लाख ८२ हजार ग्राहकांपैकी ९२ हजार ८८० कृषीपंपधारक ग्राहक आहेत. या ग्राहकांना परभणी शहर, पाथरी, पूर्णा, परभणी ग्रामीण, गंगाखेड, जिंतूर, मानवत, पालम, सेलू, सोनपेठ या १० उपविभागांतून वीजपुरवठा केला जातो. तसेच ग्राहकांच्या विजे संबंधी अडचणी याच उपविभागांतर्गत सोडविल्या जातात. वीज वितरण कंपनीच्या वतीने वीजपुरवठा केलेल्या ग्राहकांना महिन्याकाठी बिल दिले जाते; परंतु, चार ते पाच वर्षांपासून महावितरणच्या ९२ हजार ८८० ग्राहकांनी आपल्या कृषीपंपाचा वीज बिलाचा भरणा केलेला नाही. त्यामुळे महावितरणच्या थकबाकीचा डोंगर वाढत आहे. परभणी ग्रामीण उपविभागात १६ हजार ८६७ कृषीपंपधारकांकडे १४३ कोटी २ लाख रुपयांची थकबाकी आहे. परभणी शहर उपविभागात ६५१ ग्राहकांकडे ५ कोटी ४७ लाख, पाथरी उपविभागात १० हजार १८३ ग्राहकांकडे ८४ कोटी ५९ लाख, पूर्णा उपविभागात १० हजार ६०६ ग्राहकांकडे ८४ कोटी ७८ लाख, गंगाखेड उपविभागात ८ हजार ८५० ग्राहकांकडे ६५ कोटी ९० लाख, जिंतूर उपविभागातील १७ हजार २२७ कृषीपंपधारकांकडे १६८ कोटी ९३ लाख, मानवत उपविभागात ७ हजार ९१३ ग्राहकांकडे ६७ कोटी ५० लाख, पालम उपविभागात ५ हजार ९५० ग्राहकांकडे ४३ कोटी ४२ लाख, सेलू उपविभागांतर्गत १० हजार ४१४ ग्राहकांकडे ८८ कोटी २० लाख, सोनपेठ उपविभागात ४ हजार ७०४ ग्राहकांकडे ३७ कोटी ३४ लाख अशी एकूण ९२ हजार ८८० ग्राहकांकडे ७८९ कोटी ३३ लाखांची थकबाकी आहे.साडेसातशे कोटी रुपयांची वीज बिल वसुली करताना महावितरणला नाकीनऊ येत असून, वसुलीसाठी विशेष मोहिमा आखण्याची गरज निर्माण झाली आहे.
कृषी पंपधारकांकडे ७८९ कोटींची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:30 AM