औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात गेल्या ७५ दिवसांत तातडीने गरजेच्या असलेल्या तब्बत ७९४ शस्त्रक्रिया घाटी रुग्णालयात पार पडल्या. यात १४० मोठ्या, तर ६५४ लहान सर्जरींचा समावेश आहे. त्यापैकी दोन पॉझिटिव्ह रुग्णांच्याही शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ते रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर एक पॉझिटिव्ह रुग्ण शस्त्रक्रियेसाठी भरती आहे. त्याच्यावर शल्यचिकित्साशास्त्र विभाग उपचार करीत असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी दिली.
कोरोना संक्रमण सुरू झाल्यावर अडीच महिन्यांच्या काळात अत्यावश्यक शस्त्रक्रिया सुरू ठेवून ऐच्छिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. सरोजनी जाधव यांच्या मार्गदर्शनात गरजेच्या शस्त्रक्रिया सुरू असून, पुढे ऐच्छिक शस्त्रक्रिया हळूहळू रुळावर आणण्याचे काम सध्या घाटी रुग्णालयात सुरू आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणजेच मेडिसिन इमारतीच्या वॉर्ड २ मध्ये आॅपरेशन थिएटरची व्यवस्था करण्यात आली. तिथे एक सर्जरी आणि तीन सिझेरियन करण्यात आले. यासाठी विभागातील आरोग्य कर्माचारी, परिचारिका, निवासी डॉक्टरांना संसर्ग होणार नाही यासाठी विभागप्रमुख डॉ. जाधव विशेष काळजी घेत आहेत, तर सर्जिकल इमारतीत नॉन कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बाह्यरुग्ण विभागातील रुग्ण अनलॉक १ सुरू झाल्यापासून वाढायला सुरुवात झाली असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरबडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
कोरोनाबाधित दोघांची शस्त्रक्रिया- कन्नड तालुक्यातील ४२ वर्षीय बाधित व्यक्तीला पोटदुखीचा त्रास होता. त्यांची तातडीने अॅपेंडिक्सची शस्त्रक्रिया करावी लागली. डॉ. हरबडे यांच्या पथकातील डॉ. जुनेद अथर यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया पूर्ण केली, तर शाहबाजार येथील मधुमेह असलेल्या ४५ वर्षीय बाधित व्यक्तीला झालेल्या मोठ्या जखमेला दररोज साफ करण्याचे काम डॉ. अनंत बीडकर यांच्या पथकातील डॉ. सचिन जंगले यांच्या टीमने केले.
- हा रुग्ण कोरोनामुक्त झाल्यावर सर्जरी विभागात पुढील उपचार घेत असून, स्वादुपिंडाचा दाह असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील ४० वर्षीय बाधित रुग्णावर उपचार सुरू असून, डॉ. सरोजनी जाधव, डॉ. अनिता कंडी, डॉ. मोबीन अन्सारी, डॉ. गजानन चौधरी आदी उपचार करीत आहेत.
महिना मोठ्या शस्त्रक्रिया लहान शस्त्रक्रियाएप्रिल ६७ २७६मे ४२ २५०जून(१५ जूनपर्यंत) ३१ १२८