महाआवास ग्रामीण योजना थंडावली : २२ हजार १६२ कुटुंब घराच्या प्रतीक्षेत, खुलताबाद, सिल्लोड, सोयगावचे काम मंदावले
---
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्यात मुख्यमंत्र्यांनी सुरु केलेल्या महत्त्वाकांक्षी महाआवास ग्रामीण योजनेतून १०० दिवसात विविध योजनांचा कृतीसंगम घडवून लाभार्थ्याला घरकुल उभारुन देण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, १०० दिवसात केवळ ८१९ घरकुलांची उभारणी झाली. जिल्ह्यात घरकुल उभारणी ४४.४० टक्क्यांपुढे गेली नाही. मंजूर ३९ हजार २५ घरांपैकी केवळ १७ हजार ७०० घरकुले पूर्ण झाली असून, २२ हजार १६२ कुटुंब डोक्यावर हक्काचे छत मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
२० नोव्हेंबर २०२०ला राष्ट्रीय घरकुल दिनानिमित्त सुरु झालेल्या योजनेवेळी ३९ हजार ८६२ घरकुल बांधणीचे उद्दिष्ट होते. त्यावेळी जिल्ह्यात ३१ हजार ६९९ घरकुलांना मंजुरी तर १६ हजार ८८१ घरकुले पूर्णत्वास आली होती. गेल्या १०० दिवसात केवळ ८१९ घरकुले बांधून पूर्ण झाली तर ७ हजार ३२६ लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी देण्यात आली. आता २२ हजार १६२ घरकुले विविध कारणांनी पूर्ण झालेली नाहीत. पंतप्रधान, रमाई, शबरी, पारधी आवास योजना या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून राबविण्यात येतात. प्रत्यक्षात गटविकास अधिकाऱ्यांमार्फत ही कामे होतात.
कोरोनाचा प्रादुर्भाव महाआवास योजनेच्या सुरुवातीपासून पुढील १०० दिवस कमी होता. मात्र, तिन्ही योजनांचे काम ४५ टक्क्यांपेक्षा अधिक होऊ शकले नाही. सुरुवातीला आघाडीवर असलेल्या खुलताबाद, ग्रामविकास राज्यमंत्र्यांचा मतदार संघ असलेल्या सिल्लोड, सोयगाव आणि फुलंब्री तालुक्यातील घरकुले पूर्ण होण्याचे प्रमाण सर्वात कमी असून, गंगापूर, वैजापूर, पैठण तालुक्यात काम अधिक झालेले दिसते.
---
पंतप्रधान आवास योजनेची
५ वर्षातील १० हजार ८९२ घरकुले अपूर्ण
---
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये २०१६-१७चे ६६१, २०१७-१८चे ३५४, २०१८-१९चे २४२, २०१९-२०चे २,८२६, २०२०-२१चे ६,८०९ अशी १० हजार ९९२ घरे अद्याप पूर्ण व्हायची आहेत. तर या योजनेतून ११ हजार २७१ घरे पूर्ण झाली. म्हणजेच मंजूर घरकुलांपैकी ५०.८६ टक्के लाभार्थ्यांचे घरकुल पूर्ण झाले. औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक काम या योजनेतून झाले असून, सोयगाव तालुक्यात सर्वात कमी काम झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होते.
---
रमाई योजनेची ३४.५१ टक्के घरकुले पूर्णत्वास
--
रमाई आवास योजनेतून गेल्या पाच वर्षात १५ हजार २९७ घरे बांधण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १४ हजार ६७४ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. मध्यंतरी निधीअभावी घरकुले अपूर्ण अवस्थेत होती. मात्र, जानेवारीच्या सुमारास निधीचा प्रश्न सुटल्याने रमाई घरकुल योजनेच्या कामाला गती आली. आतापर्यंत ५ हजार २७९ घरे पूर्ण झाली तर १० हजार १८ घरे अपूर्ण असून, हे प्रमाण केवळ ३४.५१ टक्के आहे. खुलताबाद तालुक्याचे सर्वाधिक काम असून, तुलनेत औरंगाबाद, फुलंब्री तालुक्यातील काम कमी दिसते.
----
‘शबरी आवास’चे ४७.४७ टक्के काम
---
शबरी आवास योजनेतून २,२३२ घरकुलांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून मंजुरी देण्यात आली. त्यापैकी १,१२३ घरे पूर्ण झाली असून, १ हजार २३४ घरे अपूर्ण आहेत. खुलताबाद तालुक्याचे काम सर्वाधिक ६८.५२ टक्के काम झाले असून, सर्वात कमी काम औरंगाबाद तालुक्याचे आहे.