औरंगाबाद : पडेगाव येथील एका संस्थेच्या उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक कोरोनाबाधित आढळून आल्याचे शिक्षण विभागाला शाळेकडून कळविण्यात आले. यात काळजी म्हणून पुढील आठ दिवस शाळा बंद ठेवून नियमाप्रमाणे तपासणी व निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ.बी.बी. चव्हाण यांनी सांगितले.
बाधित आढळून आलेले शिक्षक आधीच दोन ते तीन दिवस शाळेत आले नव्हते. त्यानंतर, दोन दिवस शाळेला सुट्टी होती. त्यामुळे चिंतेचे कारण नसले, तरी विद्यार्थ्यांना जोखीम नको, म्हणून संबंधित शाळा आठ दिवस बंद ठेवण्याचे शाळा प्रशासनाला सांगण्यात आले आहे. अद्याप जिल्ह्यात एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झाल्याची नोंद नसल्याचे सांगत योग्य ती काळजी शाळांकडून घेतल्याने चिंतेचे कारण नसल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात ७७ कोरोना रुग्णांची वाढजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी एकाही कोराेना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. नव्या रुग्णांची संख्या मात्र काहीशी वाढली. दिवसभरात ७७ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ५४ जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात सध्या ३३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४७ हजार ७२२ झाली आहे, तर आतापर्यंत ४६ हजार १४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,२४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ७७ रुग्णांत मनपा हद्दीतील ७२, ग्रामीण भागातील पाच रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ४६ आणि ग्रामीण भागातील ८, अशा एकूण ५४ रुग्णांना सोमवारी सुटी देण्यात आली.