छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ८ हजार ४९६ गावांतील खरीप हंगाम पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातून गेला. विभागातील आठही जिल्ह्यांतील अंतिम पैसेवारी ५० टक्क्यांच्या आत आली असून, दुष्काळाच्या दुष्टचक्रात मराठवाडा असल्याचे सध्याचे चित्र आहे.
मागील वर्षी सततच्या पावसाने व अतिवृष्टीने नुकसान केले. त्यापोटी शासनाने २७०० कोटींची घोषणा केली. त्यातील सुमारे १७०० कोटी सततच्या पावसाच्या नुकसानीचे असून, ते पूर्ण क्षमतेने शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यातच मार्च-एप्रिल २०२३ मधील अवकाळी पाऊस, सरत्या वर्षातील पावसाळ्यात दोन जिल्ह्यांत अतिवृष्टी व सहा जिल्ह्यांत महिनाभराचा पावसाचा खंड, पुढे रब्बी हंगामात अवकाळी पिकांनी नुकसान केले असून, त्यासाठी भरपाईचा अद्याप काहीही निर्णय नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून, शासनाकडून मदतीचा ओघ विलंबाने होत असल्यामुळे शेतकरी आर्थिककोंडीत सापडला आहे. दरम्यान, विभागातील ७६ तालुक्यांतील सर्व गावांतील अंतिम पैसेवारीनुसार खरीप हंगामाचे उत्पादन घटले आहे. माजलगाव तालुक्यातील ५ गावे पूर्णत: बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
पैसेवारी कमी आलेली जिल्हानिहाय गावेजिल्हा...........................गावेछत्रपती संभाजीनगर......१३५६धाराशिव.....................७१९बीड...........................१३९७परभणी.......................८३२नांदेड.........................१५६२जालना.......................९७१लातूर...........................९५२हिंगोली.......................७०७एकूण..........................८४९६
साडेनऊ लाख शेतकऱ्यांना फटकामराठवाड्यात नोव्हेंबर २०२३ महिन्याच्या अखेरीस अवकाळी पावसाचा विभागातील ९ लाख ५० हजार ८३० शेतकऱ्यांना फटका बसला. ४ लाख ८० हजार ३५१ हेक्टरवरील रब्बी, फळपिके व भाजीपाल्याचे नुकसान झाले. मराठवाड्याला २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर काळात अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २६३९३४ शेतकऱ्यांचे, जालना जिल्ह्यात १९१२१९, परभणी २३१७८७, हिंगोलीत २५७४८७, नांदेड ३७९१, लातूर ६५५, बीड १५ धाराशिव जिल्ह्यातील १९१२ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. याकाळात वीज पडल्याने ३५ मोठी, १५७ लहान जनावरे, तर इतर २४ जनावरे दगावली. ३१ घरांची पडझड झाली, १४ झोपड्यांचे, तर ८ गोठ्यांचे नुकसान झाले. वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला.
किती मदत अपेक्षित?छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १२३ कोटी, जालना ११५ कोटी, परभणी ९ कोटी, हिंगोली १० कोटी, नांदेड ५ कोटी, लातूर १६ लाख, बीड सव्वा लाख, धाराशिव अडीच कोटींचा मदत निधी अपेक्षित आहे.