सिल्लोड (औरंगाबाद ): घरकुलाचे काम झाल्यानंतर मजुरांचे १८ हजार रूपये बिल खात्यावर जमा करण्यासाठी, तसेच मस्टरवर सही करून देण्यासाठी ८ हजारांची लाच मागणाऱ्या हट्टी मोहाळ ग्रुपग्रामपंचायतचे ग्रामसेवक प्रमोद प्रल्हाद कंकाळ ( ३९, रा.सिल्लोड) विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंध विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गावातील एका ४५ वर्षीय महिलेने ग्रामसेवक प्रमोद कंकाळ याने घरकुलाचे काम झाल्यानंतर मजुरांचे बिल आणि मस्टरवर सही करण्यासाठी लाच मागितल्याची तक्रार लाच लुचपत विभागाकडे केली होती. ८ एप्रिल रोजी ८ हजार रुपये लाचेची मागणी कंकाळने केली होती. तडजोड अंती २ हजार रुपये देण्याचे ठरले.
एसीबीने तक्रारीची पडताळणी करून १२ एप्रिल रोजी सापळा रचला. मात्र, कारवाई दरम्यान संशय आल्याने ग्रामसेवक कंकाळ याने लाच घेण्यास नकार दिला. तसेच तक्रादार यांना भेटून मस्टरवर सही करण्यास नकार दिला. त्यानंतर ग्रामसेवक कंकाळविरुद्ध लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा अधिकारी म्हणून लाच लुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक दीपाली भामरे, अनिता इटूबोने यांनी काम पाहिले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे,पोलीस उपअधीक्षक मारोती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोना दिगंबर पाठक, सुनील पाटील, साईनाथ तोडकर, प्रकाश घुगरे, चांगदेव बागुल यांनी केली.